

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मतमोजणी दरम्यान ईव्हीएम (EVM) मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास निकाल पाहण्यासाठी 'पाडू' (PADU - Printing Auxiliary Display Unit) या विशेष यंत्राचा वापर केला जाणार आहे.
'पाडू' हे एक असे सहायक यंत्र आहे जे मतदान यंत्रातील तांत्रिक बिघाडाच्या वेळी निकालाचा डेटा वाचण्यास मदत करते. मुंबई महापालिकेसाठी 'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड'ची (BEL) 'M3A' प्रकारातील प्रगत मतदान यंत्रे वापरली जात आहेत. जर कंट्रोल युनिटमध्ये (CU) निकाल दिसण्यात काही अडचण आली, तरच या यंत्राचा वापर केला जाईल.
राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, 'पाडू' यंत्राचा वापर सरसकट सर्वच ठिकाणी केला जाणार नाही. मतमोजणी ही बॅलेट युनिट (BU) आणि कंट्रोल युनिट (CU) जोडूनच केली जाईल. मात्र, अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत आणि तांत्रिक अडचण उद्भवल्यास 'बेल' कंपनीच्या तज्ज्ञ तंत्रज्ञांच्या उपस्थितीतच या यंत्राचा वापर करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.
निवडणूक प्रक्रियेत कोणताही संशय राहू नये यासाठी या यंत्राच्या वापराबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यात आली आहे. आयोगाच्या सूचनेनुसार, मुंबई महानगरपालिकेने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना 'पाडू' यंत्राचे थेट प्रात्यक्षिक (Demo) दाखविले असून, तांत्रिक बिघाडाच्या वेळी हे यंत्र कशा प्रकारे अचूक निकाल दर्शवते, याची खात्री पटवून दिली आहे.
यंत्रांची उपलब्धता : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकूण १४० 'पाडू' यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
प्रगत तंत्रज्ञान : ही यंत्रे केवळ मुंबई निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या 'M3A' मॉडेलसाठीच सुसंगत आहेत.
पारदर्शकता : राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीतच तांत्रिक अडचणीच्या वेळी याचा वापर होणार.