

मुंबई : कर्जबाजारी दिशेने वाटचाल करणाऱ्या महापालिकेने उत्पन्न वाढवण्यासाठी आता हॉटेल व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दहिसर टोल नाक्यावर असलेल्या मोकळ्या भूखंडावर १३१ खोल्यांचे पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
दहिसर येथे सुमारे १८ हजार ६०० चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळाचा भूखंड असून नव्या विकास आराखड्यानुसार यावर ट्रक टर्मिनसचे आरक्षण आहे. या जागेवर वाहतूक व व्यावसायिक केंद्र उभारण्यासाठी महापालिकेने नेमलेल्या सल्लागाराच्या आराखड्यानुसार १९ मजली इमारतीसह तारांकित हॉटेलचा समावेश आहे. इमारत क्रमांक १ व २ मध्ये ४५६ बस पार्किंग, १४२४ लहान वाहन पार्किंग आदींचा समावेश असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेने सुमारे दोन लाख कोटी रुपयांची विकासकामे हाती घेतली आहेत. ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेला मोठ्या निधीची गरज भासणार आहे. पण मुंबई महापालिकेच्या तिजोरीत आता फारसा पैसा उरलेला नाही. अलीकडे मेट्रो रेल्वेसाठीही मुंबई महापालिकेने ५ हजार कोटी रुपयांची मदत केली होती. बेस्ट उपक्रमालाही वेळोवेळी आर्थिक मदत करण्यात येत आहे. त्यामुळे विकासकामे पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेला मोठे कर्ज घ्यावे लागणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने उत्पन्न वाढवण्याकरिता वेगवेगळे स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून दहिसर येथे जकात नाके बंद झाल्यामुळे मोकळ्या झालेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. १३१ खोल्यांचे हे हॉटेल असून व्यावसायिक गाळे व कार्यालये भाड्याने देऊन महसुलात वाढ केली जाणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईत दहिसर, एलबीएस मार्ग मुलुंड, पूर्व द्रुतगती महामार्ग मुलुंड, ऐरोली व वाशी हे पाच जकात नाके आहेत. जकात वसुली बंद झाल्यामुळे हे नाके बंद पडले असून येथील मोकळ्या जागेवर वाहतूक आणि व्यावसायिक केंद्रांचे बांधकाम करून महसूल वाढवण्यावर भर राहणार आहे.