

मुंबई : अमेरिका - इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा भासत आहे. या युद्धाचा धडका आता, मुंबई महानगरपालिकेच्या उपाहारगृहापर्यंत पोहोचला आहे. गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्याकारणाने, गुरुवार दुपारनंतर महापालिकेची कॅन्टीन बंद ठेवण्याचा निर्णय उपाहारगृहचालकाने घेतला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील इमारतीच्या तळमजल्यावर प्रशस्त असे उपाहारगृह आहे. यात एकाचवेळी किमान 500 ते 1000 नागरिक जेवण व अल्पोपाहार घेऊ शकतात. मात्र सदर कॅन्टीनमध्ये असलेले गॅस सिलेंडर केवळ गुरुवारी दुपारपर्यंत चालविण्यापुरते उरले आहेत. परिणामी दुपारनंतर कॅन्टीनला टाळे लावण्याची वेळ आल्याची माहिती कॅन्टीनचालकाने दिली.
दुपारनंतर फक्त चहा मिळणार
गुरुवार दुपारपर्यंत गॅस सिलेंडर असल्याने यानंतर विद्युत शेगडीवर चहा आणि तत्सम पदार्थ मिळणार आहेत. परिणामी गॅसचा पुरवठा झाला नाही, तर पुढचे काही दिवस महापालिकेचं कॅन्टीन बंद होणार आहे.
यांचे होणार वांधे
मुंबई महापालिकेच्या कॅन्टीनमध्ये दररोज पालिकेचे हजाराहून अधिक कर्मचारी, बंदोबस्तावरील बाहेरील पोलिस, आणि महाविद्यालयीन विद्यार्थी जेवणासाठी येत असतात. दिवसाला 500 ते हजार कर्मचारी पालिका कर्मचाऱ्यांसह इतर नागरिकांच्या जेवणावळी कॅन्टीनमध्ये होतात.