मुंबई : मंगळवारी ऐन मुसळधार पावसात मोनोरेल बंद पडल्याने मुंबईकरांवर ओढवलेले संकट पुन्हा येऊ नये यासाठी एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएल यांनी अंशकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना तातडीने हाती घेतल्या आहेत. मंगळवारची घटना मोनोरेलमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरल्याने घडली. त्यामुळे यापुढे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी मोनोरेलमध्ये चढल्यास अतिरिक्त प्रवाशांना उतरवल्याशिवाय गाडी पुढे सोडली जाणार नाही.
संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास मैसूर कॉलनी स्थानकाजवळ मोनोरेल बंद पडली होती. यावेळी 1 ते दीड तास साडेपाचशेहून अधिक प्रवासी आतमध्ये कोंडले गेले होते. काहीजण गुदमरले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले. या घटनेमुळे आधीच बदनाम असणार्या मोनोरेल व्यवस्थेची आणखी नाचक्की झाली. तसेच मोठी दुर्घटना होता होता राहिली.
पुन्हा असे प्रसंग उद्भवून प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून एमएमआरडीए व एमएमएमओसीएल यांच्यात बुधवारी संयुक्त बैठक पार पडली. यावेळी काही दीर्घकालीन व अंशकालीन उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. मोनोरेलची क्षमता 104 टनांपर्यंत आहे. पण मोनोरेल गाड्यांचे एकूण आयुर्मान पाहता तसेच त्यांची परिवहन क्षमता पाहता यापुढे कोणत्याही गाडीत प्रवासी संख्येची मर्यादा ओलांडली जाऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे.
प्रवासी क्षमता 102 ते 104 टन दरम्यान राहील. यापेक्षा वाढणार नाही यासाठी स्थानकावरील अधिकारी आणि कर्मचार्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. गाडीत प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवून नंतरच गाडी पुढे सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान, म्हैसूर कॉलनीजवळ मंगळवार, 19 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी मोनो रेलमध्ये तांत्रिक बिघाड होऊन 582 प्रवासी अडकून पडले होते. परिणामी, प्रवाशांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला. मुंबई अग्निशमन दलाच्या शूर जवानांनी अपार धाडस, समयसूचकता आणि कौशल्य दाखवत सर्व 582 प्रवाशांची सुखरूप सुटका केली.ही अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी काढले. त्यांनी भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयात जाऊन अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक केले.
मोनोरेल मदतकार्य मोहिमेचे नेतृत्व करणारे उप प्रमुख अग्निशमन अधिकारी अनिल परब यांच्यासह उप अग्निशमन अधिकारी आर. बी. घाडगे, एम. व्ही. सावंत, वाय. पी. शेलार, सहायक अग्निशमन अधिकारी आर. एस. करलकर, वरिष्ठ केंद्र अधिकारी आय. के. कांबळे, केंद्र अधिकारी डी. ए. भोसले, वाय. एच. पवार, डी. एस. चौधरी, एस. व्ही. भोर आदींचा गगराणी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मुंबईतील मोनोरेलमध्ये मंगळवारी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. जादा प्रवाशांमुळे गुदमरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने काच फोडून शिड्यांच्या साहाय्याने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले, असेही पवार म्हणाले.
पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, उपनगर, सातारा घाटमाथा आणि पुणे घाटमाथा येथे मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महापालिकेने सुट्टी जाहीर केली असून, अत्यावश्यक गरज वगळता नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नैसर्गिक संकटात राजकारण करण्याची वेळ नाही. प्रत्येक सरकार आपल्या कारकिर्दीत काम करण्याचा प्रयत्न करते, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
अंशकालीन उपाययोजना
1.प्रवासी क्षमता 102 ते 104 टन यापेक्षा वाढणार नाही यासाठी स्थानकावरील अधिकारी आणि कर्मचार्यांना विशेष सूचना. क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवून नंतरच गाडी पुढे सोडणार.
2. प्रत्येक मोनोरेलमधील सर्व 8 खिडक्यांची तातडीने तपासणी करून त्यांचे स्पष्ट लेबलिंग करणार; जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत त्यांचा वापर करता यावा.
3. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी काय करावे, सुरक्षित मार्ग कुठला आहे, याबाबत स्पष्ट माहिती असलेले सूचना फलक गाड्यांमध्ये लावण्यात आले आहेत. त्यात वाढ करणार.
4. मोनोरेलच्या सर्व गाड्यांची तातडीने सुरक्षा तपासणी करणार.
5. प्रत्येक मोनोरेलमध्ये एक सुरक्षा कर्मचारी जो आतील गर्दीवर लक्ष ठेवेल. मोनो पायलटसोबत एक तंत्रज्ञ तैनात.
दीर्घकालीन उपाययोजना
मोनोरेलसाठी नव्या 10 गाड्या मागवण्यात आल्या आहेत. पैकी 7 गाड्या डेपोमध्ये दाखल झाल्या असून त्यांची तपासणी आणि चाचणी सुरू आहे. या चाचण्यांनंतर सर्टिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करून या गाड्या सेवेत दाखल केल्या जातील. त्यामुळे प्रवासी क्षमता वाढेल आणि उपलब्ध मोनोगाड्यांवरील ताण कमी होईल.