मुंबई : प्रकाश साबळे
सव्वा दोन कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरातील रस्ते सफाई आणि कचरा संकलन करण्यासाठी मुंबई महापालिकेत कायमस्वरुपी फक्त २८,०३८ इतके कामगार आणि पर्यवेक्षीय कर्मचारी कार्यरत आहेत. तर ३,५८१ पदे रिक्त आहेत. परिणामी मनपाला सुमारे ५ हजार कंत्राटी कामगारांवर सफाई करून घेण्याची वेळ येत आहे.
ही पदे रिक्त
पर्यवेक्षीय संवर्गाची कनिष्ठ अवेक्षक १०५
सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक २०
उपमुख्य पर्यवेक्षक ०४
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांची सन १९८१ नंतर भरती प्रक्रिया झालेली नाही. यामुळे सध्या कार्यरत २८,०३८ कामगारांवर सफाईचा डोलारा उभा आहे. तर दुसरीकडे वस्ती स्वच्छता, रस्ते स्वच्छता आणि मोटर लोडिंग अशा योजनांद्वारे ६ महिन्यांसाठी कंत्राटी कामगारांची नेमणूक करून रस्त्यांची परिणामी कायमस्वरुपी भरती करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप मुनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केला आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागात महापालिका प्रशासन कामगारांची भरती न करता खासगीकरणाचा प्रयत्न करत आहे. सफाई कामगारांच्या वारसांना पी.टी. केसवर घेवून त्यांची बोळवण करत आहे. परंतु लोकसंख्या व वाढत्या रस्त्यांच्या संख्येनुसार महापालिका प्रशासन कामगारांची भरती करण्याकडे प्रत्यक्षपणे दुर्लक्ष करत आहे. कचरा गाडीवर भरती प्रक्रिया पार पडली, परंतु रस्ते सफाई व कचरा संकलनासाठी कामगारांची मात्र भरती होत नाही, यामागचे कारण काय आहे, असा प्रश्न कामगारांकडून उपस्थित केला जावू लागला आहे.
मुंबई महापालिकेच्या साफ-सफाई खात्यातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी घनकचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंता प्रशांत पवार यांच्या दालनात बैठक पार पडली. यावेळी मुंबईची लोकसंख्या १९८५ साली सुमारे ५२ लाख होती, त्यावेळेपासून साफ- सफाई खात्यातील कर्मचारी संख्या ३१ हजार ६१७ एवढीच आहे. सध्या मुंबईची लोकसंख्या सुमारे सव्वा दोन कोटी झाली आहे. मात्र २८,०३६ कर्मचारीच कार्यरत असून ३५८१ पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदे तात्काळ भरावीत व लोकसंख्येच्या प्रमाणात सफाई कामगारांची संख्या वाढवावी अशी मागणी मुनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय कांबळे यांनी केली आहे. वाढलेला कचरा त्याचे संकलन व विल्हेवाट याचा आढावा घेऊन कामगार संख्या वाढविण्याबाबत वरिष्ठांना प्रस्ताव सादर करण्यात येईल असे आश्वासन प्रमुख अभियंता पवार यांनी दिले आहे.
यावेळी बैठकीमध्ये सफाई खात्यातील सर्वच ४०० चौक्यांचे नुतनीकरण करण्यात येणार असून, युनियनच्या मागणीनुसार प्रत्येक सफाई चौकीवर पिण्याचे पाणी (ॲक्वागार्ड), पुरुष व स्त्री कामगारांना स्वतंत्र शौचालय, स्वतंत्र चेंजीग रूम इत्यादींची सोय केली जाणार आहे. तसेच दादर चैत्यभूमी येथील सफाई चौकी मॉडेल चौकी म्हणुन बांधली जाणार असल्याची माहीती बापेरकर यांनी दिली.
कर्मचाऱ्यांच्या आस्थापना कामांचा तसेच प्रलंबित पी. टी. प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. त्यासाठी लिपिक संवर्गाची १४५ रिक्त पदे तातडीने भरण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. सदर बैठकीस चिटणीस संजय वाघ, रामचंद्र लिंबारे व महेश गुरव तसेच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.