

मुंबई : नमिता धुरी
मुंबईतील भूखंडांची कमतरता, गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासात गृहसाठ्याऐवजी अधिमूल्य देण्याची मुभा, इत्यादी कारणांमुळे मुंबईत म्हाडाच्या गृहसाठ्याला मर्यादा येत आहेत. याचा सर्वाधिक फटका अत्यल्प उत्पन्न गटाला बसत असून या वर्गासाठी आवश्यक असलेली लहान आकाराची घरे सद्यस्थितीत फारच कमी उपलब्ध आहेत.
सर्वसामान्य नोकरदार वर्गाला मुंबईत परवडणारे घर देणे हे म्हाडाचे उद्दिष्ट आहे; मात्र सद्यस्थितीत अत्यल्प उत्पन्न गटाला देण्यासाठी म्हाडाकडे फारशी घरेच नाहीत. २०२३ साली निघालेल्या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १ हजार ९४७ घरे व आणखी ८४३ घरे अत्यल्प गटासाठी होती. त्यामुळे अत्यल्प गट खूष होता मात्र त्यानंतर २०२४ साली निघालेल्या सोडतीत या गटाची निराशा झाली.
गतवर्षी २०३० सदनिकांपैकी केवळ ३५९ अत्यल्प गटात होत्या. अल्प गटासाठी ६२७, मध्यम गटासाठी ७६८ आणि उच्च गटासाठी २७६ सदनिका होत्या. येत्या मार्चमध्ये सोडत नियोजित असून यासाठी अत्यल्प गटाच्या घरांची बरीच शोधाशोध म्हाडाला करावी लागत आहे.
कारणे काय ?
म्हाडा सोसायट्यांचा पुनर्विकास होताना गृहसाठ्याऐवजी अधिमूल्य देण्याचा पर्याय सोसायट्या निवडतात. उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासातून अतिरिक्त घरे निर्माण होतात. यातील ३०० ते ७५३ चौरस फुटांची घरे बृहतसूचीसाठी वापरली जातात. त्यापेक्षा मोठी घरे मुंबई मंडळाला मिळतात. मोठ्या क्षेत्रफळामुळे ही घरे मध्यम किंवा उच्च गटात जातात. याशिवाय मुंबईत घरे बांधण्यासाठी जागाच शिल्लक न राहिल्याने म्हाडाला लहान घरे बांधता येत नाहीत. अत्यल्प गटाला अल्प गटात अर्ज करता येत असला तरी यामुळे अल्प गटात स्पर्धा वाढते. दोन्ही गटांतील किंमती प्रचंड असल्याने वार्षिक ६ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना घर घेताच येत नाही.
सध्या सुरू असलेले प्रकल्प
मागाठाणे येथील २० मजली इमारत २०२७ पर्यंत तर भाबरेकरनगर प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होईल. प्रतीक्षानगर येथे २२ मजल्यांच्या तीन इमारती अंतिम टप्प्यात आहेत. चौथ्या इमारतीच्या पायाचे काम झाले असून आणखी दोन चाळी पाडल्या जाणार आहेत. कन्नमवारनगर येथील प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण होईल. पत्राचाळ प्रकल्पाला ३ वर्षे लागणार आहेत.
३० चौरस मीटरपेक्षा लहान घरे घेण्यास ग्राहक फार उत्सुक नसतात असा अनुभव आहे. त्यामुळे बऱ्याचदा ३० चौरस मीटरपेक्षा मोठ्या घरांचा आराखडा तयार केला जातो. पत्राचाळीतील घरे ३० चौरस मीटरपेक्षा मोठी असल्याने अत्यल्प गट दर्शवलेला नाही; मात्र या गटाला अल्प गटात अर्ज करता येईल. घरांच्या किंमती नक्कीच कमी असतील. शिल्लक घरे, समूह पुनर्विकास आणि उपलब्ध झालेले भूखंड यांमध्ये भविष्यात अत्यल्प गटाला घरे मिळण्यास वाव आहे.
मिलिंद बोरीकर, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ