

मुंबई : मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसाने मेट्रो 3 भुयारी मेट्रो मार्गिकेच्या आचार्य अत्रे चौक स्थानकात पाणी शिरले होते. त्यानंतर हे स्थानक पूर्ववत करण्यात आले मात्र इतरत्र स्थानकांतील पाणी गळती रोखण्यात अद्याप मेट्रो प्रशासनाला यश आलेले नाही. बीकेसी आणि वरळी मेट्रो स्थानकांमध्ये पाणी गळती होताना दिसून येत आहे.
काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी समाजमाध्यमांवर बीकेसी व वरळी येथील पाणी गळतीची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. यानुसार वरळी मेट्रो स्थानकात चार ठिकाणी गळती होत आहे. या ठिकाणी एकतर बादल्या ठेवल्या जातात किंवा कर्मचार्यांना सतत पाणी पुसण्याचे काम करावे लागते. काही ठिकाणी मेट्रो स्थानकांच्या प्रवेशद्वाराची कामे सुरू आहेत. तेथून पाणी आत येऊ नये म्हणून हे भाग ताडपत्रीने झाकण्यात आले आहेत.
बीकेसी मेट्रो स्थानकातही पाणी गळती होत असल्याने हा भाग प्रतिबंधित करण्यात आला होता. या परिस्थितीचे चित्रीकरण कोणी करू नये म्हणून तसे फलक लावण्यात आले आहेत.‘मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशनसाठी हा पावसाळी हंगाम पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर प्रत्यक्ष चाचणीचा काळ आहे. काही ठिकाणी किरकोळ समस्या उद्भवत आहेत. त्या दुरुस्त करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत आणि हे काम संपूर्ण पावसाळ्यात सुरूच राहील’, असे स्पष्टीकरण एमएमआरसीएलने दिले आहे.
सर्वच ठिकाणी पाणी थेंबथेंबाने गळणे म्हणजे बांधकामातील त्रुटीच असेल असे नाही. काही स्थानकांवर प्रवाशांच्या ये-जा करण्यासाठी मोठ्या मोकळ्या जागा, एअर वेंट्स आणि वातानुकूलनासाठी डक्ट्स ठेवण्यात आले आहेत. जोरदार पावसात आणि वार्यातून वा उघड्या भागांतून पावसाचे पाणी आत येऊन एखाद्या ठिकाणी थेंब पडू शकतात. अशा प्रकारच्या घटना संपूर्ण 22 किलोमीटरच्या मेट्रो मार्गात केवळ काही ठिकाणीच आढळतात. याशिवाय, अधिक आर्द्रतेमुळे वातानुकूलनामुळे थेंब पडणे हेही सामान्य आणि नैसर्गिकच आहे’, असेही एमएमआरसीएलने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.