मुंबई : रविवारची सुट्टी संपवून सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जात असलेल्या चाकरमान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रो 1 आणि मोनोरेल दोन्हींमध्ये एकाच दिवशी बिघाड झाल्याने नोकरदारांचे वेळापत्रक बिघडले. यामुळे मेट्रो स्थानकांमध्ये मोठी गर्दी झाली होती.
मेट्रो 1 मार्गिकेवर वर्सोवाहून सकाळी 8.30 वाजता घाटकोपरला जाण्यासाठी मेट्रो निघाली; मात्र मेट्रोला अपेक्षित वेग पकडता येत नव्हता. त्यामुळे आझादनगर मेट्रो स्थानकात मेट्रो थांबवून प्रवाशांना उतरवण्यात आले व तेथूनच मेट्रो कारशेडमध्ये नेण्यात आली. यामुळे मेट्रोच्या इतर फेर्यांवरही परिणाम झाला व घाटकोपर मेट्रो स्थानकात प्रचंड गर्दी उसळली.
गेल्या काही दिवसांपासून मोनोरेलच्या अनेक फेर्या रद्द होत आहेत. गाड्या कमी असल्याने दोन फेर्यांमधील प्रतीक्षा कालावधी 18 मिनिटे आहे. त्यातच सोमवारी तांत्रिक बिघाड झाल्याने मोनोरेल उशिराने धावत होती. सध्या मोनोरेलकडे 6 नव्या गाड्या दाखल झाल्या असून त्यांच्या सिग्नलिंग यंत्रणेचे काम सुरू आहे. या गाड्या वाहतूक सेवेत कधी दाखल होतील याची प्रतीक्षा मोनोरेलचे प्रवासी करत आहेत.
मेट्रोच्या दैनंदिन वेळापत्रकाप्रमाणे सकाळी गर्दीच्या वेळेस एका तासात 36 फेर्या चालवल्या जातात. त्यातून 65 हजार प्रवासी प्रवास करतात. यानुसार प्रत्येक गाडीतून जवळपास 1 हजार 800 प्रवासी प्रवास करतात. सोमवारी एक गाडी बिघडल्याने मेट्रो स्थानकात एकाच वेळी अतिरिक्त 500 प्रवाशांची गर्दी झाली.
गर्दी पांगवण्यात साधारण पाऊण तास गेला. मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावरून प्रवासी मेट्रो स्थानकात येतात. त्यामुळे मेट्रो स्थानकाप्रमाणेच पादचारी पुलावरही प्रचंड गर्दी झाली होती. बिघडलेली गाडी कारशेडमध्ये नेण्यात आल्यानंतर मागून येणार्या मेट्रोगाड्या तुडुंब भरून धावत होत्या. त्यामुळे सर्वत्र चेंगराचेंगरी झाली व प्रवाशांना गुदमरल्यासारखा त्रास होऊ लागला.
सोमवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास मोनोरेलमध्ये बिघाड झाल्यानंतर या गाडीला अन्य गाडीने ओढून वडाळा येथील आगारात नेण्यात आले. त्यानंतर अतिरिक्त दोन गाड्या सोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.