

mumbai metro 5 route details in marathi
मुंबई : ठाण्यातील कापूरबावडी ते धामणकर नाका आणि धामणकर नाका ते दुर्गाडी या मुंबई मेट्रो -5 अ, टप्पा 1 आणि टप्पा 2 च्या 18 हजार 130 कोटी रुपयांच्या कामांना बुधवारी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विशेष म्हणजे ही मेट्रो-5 आता थेट उल्हासनगरपर्यंत धावणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीची बैठक झाली. मुंबई मेट्रो मार्गिका-5 अ च्या या मार्गिकेची लांबी 34.21 किमी असून या मार्गावर 19 स्थानकांचा समावेश आहे. टप्पा 1 कापूरबावडी ते धामणकर नाका आणि टप्पा 2 धामणकर नाका ते दुर्गाडी असा आहे. मार्गिका 5अ दुर्गाडी - कल्याण उल्हासनगर या प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या भागातील सुमारे 69 लाख लोकांना फायदा होईल आणि प्रवास वेळेत 40-50% बचत होईल.
प्रकल्पासाठीच्या आवश्यक परवानगीसाठी केंद्र सरकार आणि संबधित विभागाकडे गतीने कार्यवाही करावी, अशी सूचना फडणवीस यांनी यावेळी केली.
मेट्रो-5 उल्हासनगरपर्यंत
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 मार्गिका मूलत: 24.9 किमी लांबीची होती. या मार्गाचा आता 10 किमी विस्तार करण्यात आला असून, ही मेट्रो आता थेट उल्हासनगरपर्यंत धावणार आहे. तसा शासन निर्णय बुधवारी प्रसिद्ध झाला. मेट्रो 5 मार्गिकेचा पहिला टप्पा कापूरबावडी ते धामणकरनाका असा असून याचे 90 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.
या वर्षाच्या अखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. मेट्रो 5 मार्गिकेचा विस्तार आणि 5 अ मार्गिका यांचा सविस्तर आराखडा राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. बऱ्याच प्रतीक्षेनंतर या आराखड्याला मान्यता मिळाली आहे.
शासन निर्णयानुसार आता मेट्रो 5 मार्गिका एकूण 34.205 किमीची असेल. कापूरबावडी ते धामणकर नाका असा 11.9 किमीचा पहिला टप्पा आहे. तेथून पुढे दुर्गाडी चौकपर्यंत 10.475 किमीचा दुसरा टप्पा असेल. दुर्गाडी-आधारवाडी-खडकपाडा-कल्याण असा तिसरा टप्पा असेल. कल्याणच्या भोईरवाडी येथून 5 अ मार्गिका सुरू होऊन ती उल्हासनगरपर्यंत जाईल.
टप्पा 1 च्या खर्चात वाढ झाल्याने 8 हजार 400 कोटींचा टप्पा आता 9 हजार 483 कोटींवर गेला आहे. या खर्चासही सरकारने मान्यता दिली आहे. त्याचवेळेस टप्पा 2 चा खर्च 7326.12 कोटी रुपये असा तर मेट्रो 5 अ चा खर्च 4063 कोटी रुपये असा असणार आहे.