

मुंबई : मुंबईची पहिली भुयारी मेट्रो उपनगरात सुरू झाल्यानंतर आता सहा महिन्यांनी दक्षिण मुंबईकरांना त्यांची पहिलीवहिली मेट्रो मिळणार आहे. मेट्रो 3 भुयारी मार्गिकेच्या बीकेसी ते वरळीपर्यंतच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी पावणे अकरा वाजता होणार आहे.
लोकार्पणानंतर मुख्यमंत्री मेट्रोने प्रवास करणार आहेत. मात्र प्रवासी सेवा सुरू होणार का, याबाबत एमएमआरसीएलकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. आतापर्यंत मेट्रो 1, मेट्रो 2 अ, मेट्रो 7 या उन्नत मेट्रो मार्गिका पश्चिम उपनगरात उभारण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ मेट्रो 3 ही भुयारी मार्गिका आरेपासून ते कुलाबा-कफ परेडपर्यंत नियोजित आहे; मात्र गेल्या वर्षी या मार्गिकेच्या केवळ आरे ते बीकेसी या उपनगरातील टप्प्याचेच लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर दक्षिण मुंबईत मेट्रो कधी धावणार याची वाट मेट्रो प्रवासी बघत होते.
कफ परेडपर्यंत मेट्रो सुरू करण्यासाठी जून-जुलैची वाट पाहावी लागेल; मात्र त्याआधी एप्रिलमध्ये वरळीपर्यंत ही भुयारी मेट्रो सेवा देण्याचे नियोजन होते. विविध सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण न झाल्याने एप्रिलमध्ये मेट्रो सुरू करता आली नाही. आता मात्र सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली सीएमआरएस चाचणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे हा टप्पा वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजन एमएमआरसीएलने केले होते; मात्र त्यांची वेळ मिळू शकलेली नाही. त्यामुळे शुुक्रवारी सकाळी पावणे अकरा वाजता मुख्यमंत्रीच लोकार्पण करणार आहेत.
आरे, सीप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहार रोड, डोमेस्टिक विमानतळ, सांताक्रूझ, विद्यानगरी, बीकेसी.
बीकेसी - धारावी - शितळादेवी - दादर - सिद्धिविनायक - वरळी - आचार्य अत्रे चौक.