

मुंबई : ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो 5 मार्गिकेच्या गाड्यांसाठी 2 हजार 481 कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. तितागढ रेल सिस्टीम्स लिमिटेड यांच्याकडून प्रत्येकी 6 डब्यांच्या 22 गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत.
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 मार्गिका 24.9 किमी लांबीची असून यावर 14 स्थानके आहेत. तितागढ रेल सिस्टीम्स लिमिटेडला देण्यात आलेल्या कंत्राटात मेट्रो गाड्यांसह सिग्नलिंग व टेलिकॉम, प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे, डेपो प्लांट मशिनरी यांचा समावेश आहे. मेट्रो 5 मार्गिकेवर बाळकुम नाका, कशेली, काल्हेर, पूर्णा, अंजुरफाटा, धामणकर नाका, भिवंडी, गोपाळ नगर, टेमघर, रजनोली, गोव गाव, कोन गाव, लाल चौकी, कल्याण स्टेशन, कल्याण एपीएमसी ही स्थानके आहेत. त्यापुढे उल्हासनगर, अंबरनाथपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याचा विचार सुरू आहे.
सध्या ठाणे ते धामणकर नाका, भिवंडी या पहिल्या टप्प्यातील काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. पुढील टप्प्याचे काम मात्र मंदगतीने सुरू आहे. भिवंडी ते कल्याण या टप्प्यात 735 इमारती बाधित होत असल्याने हा टप्पा भूमिगत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
5 किमी टप्प्यातील मेट्रो भूमिगत करण्याचा व्यवहार्यता अभ्यास सुरू आहे. मात्र त्याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नाही. मात्र पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याने 22 मेट्रोगाड्यांचे कंत्राट देण्यात आले आहे.