

मुंबई : वडाळा-कासारवडवली-गायमुख या मेट्रो 4 आणि मेट्रो 4 अ मार्गिकेवरून प्रवासी वाहतूक लवकरच सुरू करण्याचे नियोजन आहे. प्रवाशांना तिकिटांच्या रांगेत थांबावे लागू नये यासाठी स्वयंचलित तिकीट प्रणालीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने 250 कोटींचे कंत्राट ऑरिअनप्रो सोल्युशन्स यांना दिले आहे.
आतापर्यंत मुंबईत 4 मेट्रो मार्गिका सुरू झाल्या आहेत. या मार्गिकांवरून प्रवास करणार्या प्रवाशांना तिकिटांसाठी रांगेत उभे राहावे लागू नये यासाठी एनसीएमसी कार्ड, व्हॉट्सअॅप तिकिटींग, इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
तसेच स्थानकात स्वयंचलित तिकीट प्रणालीद्वारे प्रवाशांना स्वत:च तिकीट काढता येते. यामुळे प्रवास जलद व सुलभ होतो. मेट्रो 4 मार्गिका अंशत: व मेट्रो 4 अ मार्गिका डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे. या मार्गिकेवरही स्वयंचलित तिकीट प्रणाली आवश्यक आहे.
ऑरिअनप्रो सोल्युशन्सला दिलेल्या कंत्राटात संपूर्ण संगणकीय प्रणालीचा पुरवठा, तिकीट काढण्यासाठी व शुल्क स्वीकारणारी यंत्रे, इत्यादींचा समावेश आहे. पुढील 5 वर्षांसाठी हे कंत्राट देण्यात आले आहे.
ही सेवा पुरवणार्या कंपनीकडे दिल्ली मेट्रो व चेन्नई मेट्रोला सेवा पुरवण्याचा अनुभव आहे, असे कंपनीने ‘एक्स’वर प्रसारित केलेल्या पत्रकात म्हटले आहे. ही सेवा मेट्रो मार्गिकेवर सुरू झाल्यास प्रवासी स्वत:च तिकीट व पास काढू शकतात. यामुळे मेट्रो प्रशासनावरील ताणही कमी होईल.तसेच तिकिटांच्या रांगा कमी झाल्याने स्थानकात गर्दी होणार नाही. स्थानकात स्वयंचलित तिकीट प्रणालीद्वारे प्रवाशांना स्वत:च तिकीट काढता येते.