

Mumbai maratha reservation protest what is Rapid Action Force?
मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी मुंबईत हजारो आंदोलक दाखल झाले आहेत. यामुळे शहरातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.
कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनबाहेर रॅपिड ॲक्शन फोर्सच्या (RAF) दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून मराठा समाजाचे कार्यकर्ते आझाद मैदानावर जमले आहेत. यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलकांची मोठी गर्दी आहे. या गर्दीमुळे पुन्हा आज वाहतुकीवर परिणाम झाला असून, मुंबईकरांना या गर्दीचा सामना करावा लागत आहे.
आंदोलकांनी सीएसएमटी स्टेशनबाहेर रस्ता अडवल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिसांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांच्या हातात अश्रू धुराच्या कांड्या दिसत आहेत, जे जमावाला पांगवण्यासाठी वापरले जातात. दंगलसदृश परिस्थिती, आंदोलने किंवा इतर सुरक्षा धोक्यांच्या वेळी ही फोर्स तैनात केली जाते. या संवेदनशील परिस्थितीत, प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. पुढील सूचना येईपर्यंत सर्वांनी शांतता आणि संयम बाळगावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) ही केंद्रीय राखीव पोलीस दलाची (CRPF) एक विशेष शाखा आहे. तिची स्थापना १९९२ साली करण्यात आली आहे. ही फोर्स प्रामुख्याने तातडीच्या आणि संवेदनशील परिस्थितींमध्ये तैनात केली जाते. RAF चे जवान हे विशेष प्रशिक्षण घेतलेले, त्वरित प्रतिसाद देणारे आणि लोकशाही पद्धतीने जमाव नियंत्रित करणारे असतात. ते नेहमी निळ्या रंगाच्या "कॅमोफ्लॉज ड्रेस" मध्ये दिसतात.
जातीय, धार्मिक किंवा सांप्रदायिक दंगली उसळल्यावर
कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असताना
आंदोलने, मोर्चे, संप यावेळी हिंसाचार होऊ नये म्हणून
निवडणुका पारदर्शक आणि सुरक्षीत पार पडण्यासाठी
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत व बचाव कार्यासाठी
दहशतवाद, नक्षलवाद किंवा इतर सुरक्षा धोक्याच्या परिस्थितीत
आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, VVIP सुरक्षा किंवा मोठ्या मेळाव्याच्या वेळी