Mumbai transport
मुंबई ः मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे बंद पडली, सीएसएमटी ते ठाणे जलद लोकल थांबवली, धीमी लोकलही बंद करावी लागली, आणि चाकरमान्यांचा घरी परतण्याचा मार्ग कठीण बनला.pudhari photo

Mumbai transport : लोकल ठप्प; मेट्रोचा मात्र दिलासा

सकाळी सव्वा अकरा वाजता मानखुर्द ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) सेवा बंद पडली.
Published on

मुंबई : मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल विस्कळीत झाली असताना उपनगरांत प्रवास करणार्‍या प्रवाशांना मेट्रो मार्गिकांनी दिलासा दिला. मेट्रो 1, मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या उन्नत मार्गिका आणि मेट्रो 3 भुयारी मार्गिका यांवरील वाहतूक मुसळधार पावसातही सुरळीत सुरू होती.

मंगळवारी पावसाचा जोर कमी होईल या आशेने नोकरदार वर्गाने कार्यालये गाठली आणि संततधार सुरूच राहिली. परिणामी, रुळांवर पाणी साचले व नोकरदारांचा घरी परतण्याचा प्रवास अडचणीचा ठरला. सकाळी सव्वा अकरा वाजता मानखुर्द ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) सेवा बंद पडली. याच वेळी सीएसएमटी ते ठाणे मार्गावरील जलद लोकल थांबवण्यात आल्या. त्यानंतर 11.40 वाजता सीएसएमटी ते ठाणे धीम्या लोकलची वाहतूकही बंद करावी लागली.

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू होती. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास वसई रोड रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने जलद मार्गावरील लोकलगाड्यांवरही परिणाम झाला. या मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली. नालासोपारा आणि वसई रोड स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लांब पल्ल्याच्या काही गाड्या उशिराने धावल्या तर मुंबई सेंट्रल-वलसाड फास्ट पॅसेंजर आणि वापी-मुंबई सेंट्रल पॅसेंजर या गाड्या रद्द कराव्या लागल्या.

लोकल कोलमडलेली असताना उपनगरांत प्रवास करणार्‍या प्रवाशांना मेट्रोचा दिलासा मिळाला. दहिसर ते गुंदवली मेट्रो 7, दहिसर ते डीएननगर मेट्रो 2 अ आणि वर्सोवा-घाटकोपर-अंधेरी मेट्रो 1 या उन्नत मार्गिकांवरील वाहतूक भर पावसातही सुरळीत सुरू होती. पहिल्या पावसात टीकेचे लक्ष्य ठरलेली आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो 3 भुयारी मार्गिकाही मंगळवारी विनाअडथळा सुरू राहिली. दुपारी 3 वाजेपर्यंत मेट्रो 3 मार्गिकेवर 127 फेर्‍या चालवण्यात आल्या. याद्वारे 19 हजार 343 प्रवाशांनी प्रवास केला.

मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करून दादरमार्गे उपनगरांत येणार्‍या रेल्वे प्रवाशांना मेट्रोचा पर्याय उपलब्ध झाला. घाटकोपर येथून मेट्रो 1 पकडून पुढे मेट्रो 2 अ, मेट्रो 7 आणि मेट्रो 3 या मार्गिकांद्वारे प्रवाशांना इच्छित स्थळे गाठता आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news