

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी दिवसभर पावसाने धुमाकूळ घातल्याने 24 तास धावणार्या मुंबईचा वेग पूर्णपणे मंदावला. रस्ते आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रस्ते आणि लोकल वाहतुकीचा बोजवारा उडाला. सकाळी कार्यालयात जाण्यासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. पावसाने थोडीही उसंत न दिल्याने मुंबईची लाईफलाईन लोकल 25 ते 30 मिनिटे विलंबाने धावली व सर्वच स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली.
मध्य रेल्वेच्या कुर्ला, माटुंगा आणि दादर रेल्वे स्थानकांत रेल्वे रुळांवर पाणी साचले. त्यामुळे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवरील लोकल ट्रेन उशिराने धावत होत्या. चुनाभट्टी, चेंबूर आणि टिळकनगर या स्थानकांच्या परिसरात पाणी साचल्याने हार्बर रेल्वेची वाहतूकही मंदावली. हार्बर रेल्वेमार्गावरील ट्रेन 20 ते 25 मिनिटांच्या विलंबाने धावत होत्या. ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक 10 मिनिटे उशिरा सुरू होती. लोकल गाड्या काही अंशी उशिरा असल्या तरी एकही गाडी रद्द करण्यात आली नसल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले. मध्य रेल्वेवर मात्र दिवसभरात 23 लोकल रद्द कराव्या लागल्या.
पश्चिम रेल्वेच्या माहीम, दादर स्थानकांदरम्यान रुळावर पाणी साचल्याने रेल्वेसेवा बाधित झाली. पावसाचा जोर दिवसभर कायम राहिल्याने या मार्गावरील रेल्वेसेवा ही 15 ते 20 मिनिटे विलंबाने सुरू होती, तर उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे सायंकाळी घरी परतणार्या चाकरमान्यांचेही सकाळप्रमाणेच प्रचंड हाल झाले. त्यांचा प्रवास तास ते दीड तासाने वाढला.
रेल्वे विलंबाने सुरू राहिल्याने काहींनी रिक्षा- टॅक्सीचा पर्याय निवडला. मात्र तेही अवाच्या सव्वा भाडे आकारत होते. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला चांगलाच भुर्दंड पडला. मुळात कुठे अडकून पडायला नको या भीतीपोटी रिक्षा आणि टॅक्सींची संख्या कमीच होती. बेस्ट प्रशासनाने रेल्वे स्थानकापासून वेगवेगळ्या उपनगरांत जाण्यासाठी बस सोडल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र प्रवाशांच्या तुलनेत त्यांची संख्या फारच कमी होती. याशिवाय, दक्षिण मुंबईतील सायन, हिंदमाता, परळ, किंग्ज सर्कल या सखल भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचले. पश्चिम उपनगरात अंधेरी परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. ठिकठिकाणी गाड्या अडकून पडल्या.