

मुंबई : अपघातांची वाढती संख्या आणि दुर्धर आजारामुळे रक्तपेढीतील रक्तसाठ्यांचा तुटवडा वाढला आहे. त्याची दखल घेत पाच वर्षांत रक्तदानाच्या चळवळीला गती मिळाली असून रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
अनेक सेवाभावी सस्था, शाळा,महाविद्यालये यांनी वर्षभरात रक्तदान शिबिरे घेतली. त्यामुळे शहरातील रक्तपेढ्यांना मोठा आधार मिळाला. काही वर्षांपूर्वी रक्तदान हे पेड स्वरुपात केले जायचे. रक्तदात्याला दानाच्या बदल्यात काही ठराविक रक्कम दिली जायची. मात्र ही प्रथा काळाच्या ओघात मोडीत निघाली. केंद्रीय रक्तसंक्रमण परिषदेने देखील त्यावर बंधने घातली. त्यामुळे एखाद्याला आमिष दाखवून रक्तदान करण्यावर अंकुश आला. त्यानंतर रिप्लेसमेंट स्वरुपातील रक्तदानाचा पर्याय पुढे आला. ज्याला ज्या रक्तगटाची गरज आहे, त्याने या बदल्यात अन्य गटाचे रक्त दान केले तर त्याला रक्तदानाचा फायदा मिळतो.
अनेक शहरांमध्ये आजही देवाणघेवाणीची ही प्रथा सुरू आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये स्वयंसेवी रक्तदान अर्थात कुठलाही मोबदला न घेता निरपेक्ष रक्तदानाची प्रथा सुरू झाली. ही प्रथा कायम रहावी आणि रक्तदानाच्या चळवळीला गती मिळावी, रक्ताचा मुबलक पुरवठा सरकारी रक्तपेढ्यांमध्ये असावा यासाठी सरकारने स्वेच्छा रक्तदानाला प्रोत्साहन दिले आहे.
गेल्या वर्षभरात राज्यात ३५,८१२ रक्तदान शिबिरे घेण्यात आली. या शिबिरातून २१ लाख ६८ हजार ४३१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले आहे. पुणे, मुंबई रक्तदात्यांची संख्या अधिक असली तरी राज्यात पुरेसा साठा उपलब्ध असला तरी पुढील काळातील गरज लक्षात घेता राज्य रक्त संक्रमण परिषदे कडून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहसंचालक डॉ. पुरुषोत्तम पुरी यांनी सांगितले
सुदृढ आरोग्यासाठी रक्तदान करणे फायदेशीर आहे. कारण आपल्या शरीरात ४.५.-५ लिटर रक्त असते. त्यापैकी केवळ ३०० मिली रक्त घेतले जाते. रक्तदानानंतर दोन ते तीन दिवसात शरीरात नवीन रक्तपेशी तयार होतात. म्हणजेच रक्तदानामुळे नवीन रक्तपेशी तयार होण्यास वाव मिळतो. त्यामुळे आरोग्य सदृढ राहते.