मुंबई : रखडलेल्या विद्याविहार पुलाच्या कामाला मुंबई महापालिकेने गती दिली आहे. नवीन नियोजनानुसार या पुलाचे काम मे 2026 पर्यंत करण्यात येणार आहे. या पुलावरून पूर्व ते पश्चिम वाहतूक सुरू झाल्यास एलबीएस मार्गावर होणारी वाहतूक कोंडी दूर होणार असून पूर्व-पश्चिम प्रवासही जलद होणार आहे.
राजावाडी हॉस्पिटल रस्ता क्रमांक सात आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडण्यासाठी विद्याविहार रेल्वे स्टेशनवरून हा उड्डाणपूल महापालिकेकडून उभारण्यात येत आहे. मात्र तांत्रिक बाबीमुळे गेल्या पाच वर्षापासून काम रखडले होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतीच पुलाच्या कामाची पाहणी करून, हे काम पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कंत्राटदाराने नियोजन केले असून मे 2026 पर्यंत काम पूर्ण होईल असे सांगितले आहे.
दुसरीकडे पश्चिम बाजूकडील प्रकल्प बाधितांना पर्यायी सदनिका देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया पाच महिन्यात करण्यात येणार आहे. बाधितांसाठी निवासी सदनिका वाटपाचे काम आता हाती घेण्यात आले असून. येत्या 15 दिवसात विभाग कार्यालयाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
रेल्वे मार्गावर असलेल्या पुलाची रुंदी 24.30 मीटर आहे. यात दोन्ही बाजूला प्रत्येकी 2 मीटरचे पदपथ आहेत. तर पोच मार्ग 17.50 मीटर रुंदीचा असेल. त्यात प्रत्येकी 1 मीटरचा पदपथ दोन्ही बाजूस समाविष्ट आहे.
उड्डाणपूल प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे 178 कोटी रुपये आहे. यापैकी, रेल्वे मार्गावरील मुख्य उड्डाणपुलाचा खर्च सुमारे 100 कोटी रुपये तर पोच मार्ग आणि अन्य कामे यांचा खर्च 78 कोटी रुपये इतका आहे.