

पुढारी ऑनलाईन डेस्क
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी कार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मुंबई व मराठी भाषेविषयी केलेल्या विधानाबाबब तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुंबईची भाषा ही मराठीच आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही आणि घाटकोपरची भाषा ही गुजराती असल्याच्या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याचे पडसाद विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटू लागले आहेत. विरोधकांनी यावर टीकेची झोड उठवली आहे.
उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी याविषयी आक्रमक भूमिका घेतली. यावर प्रतिक्रीया देताना मुख्यमंत्र्यानी स्पष्टीकरण दिले आहे. मराठी हीच मुंबईची भाषा आहे. भय्याची जोशी काय म्हणाले हे मला माहिती नाही पण मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे आणि येथे राहणाऱ्यांने मराठी बोललेच पाहिजे. असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याच बरोबर सरकार हे सर्व भाषांचा सन्मान करते असेही ते म्हटले. ‘जर तुम्ही तुमच्या भाषेवर प्रेम करता तर इतर भाषांचाही तुम्ही सन्मान केला पाहिजे माझ्या या विधानाशी भय्याजी सहमत असतील’ अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
भय्याजींच्या वक्तव्याचा अनेक ठिकाणी निषेध देखील केला गेला. भय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात घाटकोपर मध्ये राहणाऱ्या मराठी, गुजराती भाषिक नागरिकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. घाटकोपर मध्ये मराठी गुजराती भाषा वाद कधीच होत नाही. राजकारण करण्यासाठी भाषा वाद निर्माण केला जातो. याठिकाणी सर्व भाषेचे लोक राहतात. मात्र कोणीही फक्त एका भाषेची सक्ती कोणाला करु शकत नाही. मराठी भाषेचा सन्मान केला गेला पाहिजे त्याचप्रमाणे इतर भाषेचा देखील सन्मान केला गेला पाहिजे. अशा प्रतिक्रिया घाटकोपर मधील गुजराती नागरिकांनी दिल्या आहेत. तर घाटकोपर मध्ये आधीपासून मराठी माणसाच वास्तव्य आहे. परप्रांतीय आत्ता आले आहेत. हे राजकीय नेते नेहमीच मराठी भाषेबद्दल बोलत असतात. इथे राहणाऱ्या परप्रांतीयांनी आधी मराठीचा सन्मान करावा अशी प्रतिक्रिया घाटकोपर मधील मराठी नागरिकांनी दिली आहे.