

मुलुंड : पुढारी वृत्तसेवा
शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने एका ३८ वर्षीय माथाडी कामगाराने गावठी बनावटीच्या पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना भांडुप (पश्चिम) येथील सुभाष नगरातील म्हाडा कॉलनीमध्ये घडली. मनोज चंद्रकांत भोसले असे पीडित तरुणाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोजने गुरुवारी पहाटे ४:३० ते ५:१५ च्या दरम्यान त्याच्या निवासी इमारतीच्या पायऱ्यांवर स्वतःवर गोळी झाडून घेतली. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणारा मनोज अलिकडच्या काळात आर्थिक अडचणींमुळे प्रचंड मानसिक तणावाखाली होता.
घटनेच्या वेळी, मनोज त्याच्या पत्नी आणि मुलांसह सातव्या मजल्यावरून खाली उतरत होता, तेव्हा त्याने अचानक त्याच्या कमरेत लपवलेले पिस्तूल बाहेर काढले आणि स्वतःच्या मानेवर गोळी झाडली. जोरदार गोळीबारामुळे त्याची पत्नी शुभांगी भोसले घाबरली आणि तिने त्याच्या मदतीसाठी धाव घेतली तसेच ताबडतोब पोलिसांना कळवले. या घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या शुभांगीचा जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात आला आहे.
मनोजला तातडीने फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्र जप्त केले आहे. पोलिस अहवालात 'देशी बनावटीचे बंदुक' म्हणून वर्णन केलेल्या पिस्तुलाची किंमत शून्य रुपये ठेवण्यात आली आहे. मनोजकडे हे शस्त्र कुठून आले याचा पोलीस शोध घेत असल्याचे भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांनी सांगितले.