मुंबई : मुंबई आणि कोलकाता येथील टांकसाळींमध्ये 2015-16 ते 2023-24 या कालावधीत निर्मिती झालेल्या नाण्यांपेक्षा भारतीय रिझर्व्ह बँकेत सुमारे 490 कोटी रुपयांचे मूल्य असलेली जादा नाणी जमा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खुद्द रिझर्व्ह बँकेकडे अशी ‘बेहिशेबी’ नाणी येतातच कशी आणि ऑर्डर नसताना ही नाणी तयारच कशी केली जातात, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
नाशिक, देवास आणि बंगळूर छापखान्यांतून 88 हजार 32 कोटी रुपयांच्या पाचशेच्या नवीन नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेत पोहोचण्याआधीच गायब झाल्याचे प्रकरण दै. ‘पुढारी’ने याआधी प्रसिद्ध केले होते. या नोटांचा छडा लागलेला नसताना आता रिझर्व्ह बँकेत जादा नाणी जमा झाल्याचा प्रकार घडला आहे. देशातील चलनी नोटांची छपाई भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसारच होते. नाणीनिर्मितीचे नियंत्रण मात्र केंद्र सरकारच्या हाती असले तरी या नाण्यांचाही ताळेबंद रिझर्व्ह बँकेकडेच असतो.
माहिती अधिकार कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांना मुंबई आणि कोलकाता येथील टांकसाळींनी दिलेल्या माहितीनुसार 2015-16 ते 2023 जूनअखेरपर्यंत विविध मूल्यांची 17,85,08,59,500 नाणी निर्मिती करण्यात आली. मात्र रिझर्व्ह बँकेचा ताळेबंद जादा नाणी दर्शवतो. बँकेच्या अहवालात मात्र 66,78,88,00,000 इतकी नाणी या काळात निर्माण करण्यात आली. यावरून तब्बल 48,93,79,40,500 नाणी रिझर्व्ह बँकेकडे जादा आली. ही जादा नाणी टांकसाळींच्या हिशेबात नाहीत, तर रिझव्हर्र् बँकेत ती आली कुठून आणि या नाण्यांची निर्मिती केली कुणी, असा प्रश्न आहे.
काही वर्षांपूर्वी आपल्याकडे 1 पैसा, 5 पैसे, 10 पैसे, 25 पैसे आणि 50 पैशांची नाणीनिर्मिती केली जात होती. पण या नाण्यांच्या मूल्यापेक्षा त्यांच्या निर्मितीवरच जास्त खर्च येेत असल्याने या अल्पमूल्याच्या नाण्यांची निर्मिती बंद करण्यात आली. सध्या 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपये या मूल्यांची नाणी फक्त निर्माण केली जातात. यात सर्वाधिक नाण्यांची निर्मिती कोलकाता आणि मुंबईतील टाकसाळींत केली जाते. चलनात नोटांचे प्रमाण अधिक असले, तरी आर्थिक व्यवहार सुटसुटीत व्हावेत म्हणून नाणीनिर्मिती केली जाते. असे असले तरी गुजरात आणि तामिळनाडूतील व्यवहारांत नाणी स्वीकारली जात नाहीत. देशातील इतर शहरांच्या तुलनेने मुंबई आणि कोलकाता या दोन शहरांमध्येच नाण्यांचा वापर सर्वाधिक आहे.
थोर नेत्यांची जन्मशताब्दी, एखाद्या ऐतिहासिक घटनेचा सुवर्ण महोत्सव, रजत महोत्सव किंवा गौरवाखातर नाणीनिर्मिती केली जाते. यामधून भावी पिढीला इतिहासाची ओळख होत असते. त्यानुसार केंद्र सरकारने 20 जून 2017 पासून महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारत-पाकिस्तान युद्ध, स्वामी चिन्मयानंद, लाला लजपतराय, जमशेदजी टाटा, महाराणा प्रताप, राष्ट्रपती दिवंगत एस. राधाकृष्णन, भारत-आफ्रिका फोरम स्मृतिप्रीत्यर्थ दहा रुपयांची नाणीनिर्मिती केली होती. भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू आणि पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांची मुद्रा असलेली नाणीही निघाली. मात्र 20 मे 2016 पासून या दोन थोर नेत्यांवरील नाण्यांची निर्मिती बंद करण्यात आल्याची नवी माहितीही या निमित्ताने समोर आली.