Mumbai Infrastructure | महामुंबईच्या सुविधांसाठी ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर

९ पायाभूत प्रकल्पांसाठी एमएमआरडीए घेणार पीएफसीकडून कर्ज
Mumbai Infrastructure
ठाणे-बोरिवली जुळा बोगदाPudhari
Published on
Updated on

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ९ प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यासाठी पॉवर फायनान्स कॉर्पोरशनने एमएमआरडीएला ३१ हजार ६७३ कोटी ७९ लाख रुपये कर्ज मंजूर केले आहे.

कर्जाची रक्कम मुंबई महानगर प्रदेशामधील वाहतुकीचे स्वरूप बदलणाऱ्या नऊ महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे. बुधवारी पीएफसी आणि एमएमआरडीए यांच्यात औपचारिक कर्ज करार झाला. हा करार सर्वाधिक प्राधान्य असलेल्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या आर्थिक पूर्ततेचा महत्त्वाचा टप्पा आहे. प्रकल्पाच्या एकूण किंमतीपैकी ८० टक्के रक्कम ही कर्जाच्या स्वरूपात असेल, तर उर्वरित २० टक्के रक्कम ही शासनाकडून अनुदान आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचा सहभाग अशी एकत्रित स्वरूपात असेल. एमएमआरमधील दळणवळण सुधारणे, आर्थिक वाढीस चालना देणे आणि जीवनमान उंचावणे हे या प्रकल्पांचे उद्दिष्ट आहे. एकूण कर्जाच्या रकमेपैकी १५ हजार ७१ कोटींच्या निधीची तरतूद ठाणे-बोरिवली जुळ्या बोगद्यांच्या प्रकल्पासाठी करण्यात आली आहे, तर उर्वरित १६ हजार ६०२ कोटी ७९ लाख निधीचे वाटप इतर आठ प्रकल्पांसाठी करण्यात आले आहे. या प्रकल्पांमुळे वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशामधील नागरिकांना अधिक सुरक्षित, जलद आणि शाश्वत प्रवास पर्याय उपलब्ध होतील.

हा कर्ज करार एमएमआरडीएच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हा प्रदेश काम करण्यासाठी अधिक अनुकूल होईल व नोकरदारांचे जीवनमान उंचावेल, असे अपेक्षित आहे.

'या' प्रकल्पांसाठी वापरणार निधी

• ठाणे-बोरिवली जुळे बोगदे प्रकल्प

• ठाणे खाडी किनारा मार्गाचे बांधकाम (टप्पा १)

• घाटकोपर ते ठाणेपर्यंत पूर्व मुक्त मार्गाचे विस्तारीकरण

• राष्ट्रीय महामार्ग क्र.४ ते कटाई नाक्यादरम्यान उन्नत मार्गाचे बांधकाम

• कोलशेत, ठाणे ते काल्हेर, भिवंडी दरम्यान खाडीपूल आणि जोड रस्त्याचे बांधकाम करणे

• कासारवडवली, ठाणे ते खारबाव, भिवंडीदरम्यान खाडीपुलाचे बांधकाम करणे

• कल्याण मुरबाड रोड (पाल्मस वॉटर रिसॉर्ट) ते बदलापूर रोड (जगदीश दुग्धालय) ते पुणे लिंक रोड व कर्जत आणि कसारा रेल्वे लाईन ओलांडणाऱ्या वालधुनी नदीच्या समांतर, उन्नत रस्त्याचे बांधकाम

• ठाणे शहरातील आनंदनगर ते साकेतपर्यंत पूर्व द्रुतगती महामार्गावर उन्नत मार्गाचे बांधकाम करणे

• गायमुख ते पायेगावदरम्यान खाडीपुलाचे बांधकाम

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news