मुंबईत सर्वात कमी मतदान

Maharashtra Assembly Election : राज्यात 65 टक्के मतदान
Maharashtra Assembly Election
मुंबईत सर्वात कमी मतदान झाले.File Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी राज्यात चुरशीने मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, सरासरी 65 टक्के मतदान झाले होते. सर्वाधिक मतदानाचा टक्का हा कोल्हापूर जिल्ह्यात 76.25 इतका राहिला, त्याखालोखाल गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 72.15 टक्के मतदान झाले, तर सर्वात कमी मतदान महानगरी मुंबईत (52 टक्के) झाले.

बीड, नाशिक, बारामती येथील हिंसक घटना आणि वादाचे प्रकार वगळता राज्यात शांततेत मतदान झाले. दरम्यान, निवडणुकीच्या मतदानानंतर आता निकालाची प्रतीक्षा लागली आहे. शनिवारी (दि. 23) मतमोजणी होणार असून, त्याच दिवशी निकालही लागणार आहे. राज्यात महायुती पुन्हा सत्तेवर येणार की, महाविकास आघाडी सत्ता खेचून आणणार, याचा फैसला होणार असून, नवा मुख्यमंत्री ठरणार आहे.

या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि इतर मित्रपक्षांची महायुती आणि काँगे्रस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आणि इतर घटकपक्षांची महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना होत असून, परिवर्तन महाशक्तीच्या रूपाने तिसर्‍या आघाडीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी हे पक्ष निवडणूक रिंगणात आहेत. काही मतदारसंघांत बंडखोरही उभे आहेत. बुधवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली.

बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातील मतदान केंद्रावरील हल्ला, ईव्हीएमची तोडफोड, बारामतीमध्ये दोन्ही पवार गटांतील वादावादी आणि नाशिकमधील नांदगाव येथे आमदार सुहास कांदे, समीर भुजबळ यांच्यातील संघर्ष, यामुळे मतदानावेळी राज्यात खळबळ उडाली. यामध्ये धमकी, आरोप-प्रत्यारोपानंतर गुन्हे नोंद झाले आहेत. त्याबरोबरच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बिटकॉईनप्रकरणी करण्यात आलेले गंभीर आरोप, यामुळे मतदानादिवशी राज्यातील राजकारण ढवळून निघाले. अपवाद वगळता मतदान शांततेत झाले. दरम्यान, ‘एक्झिट पोल’चे अंदाजही काही वृत्तवाहिन्यांनी प्रकाशित केल्याने निकालाविषयीची उत्कंठा वाढली आहे. शनिवारी महाराष्ट्राची सत्ता कोणाकडे? आणि मुख्यमंत्री कोण? असणार हे स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news