

मुंबई ः गिरगाव येथे दोन कोटीची कॅश घेऊन दोन तोतया पोलिसांनी पलायन केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. गौरव मसुरकर असे या 44 वर्षीय आरोपीचे नाव असून तो परळचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 45 लाखांची कॅश आणि तीन मोबाईल जप्त केले आहे. त्याच्या चौकशीतून इतर आरोपींचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
यातील 65 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार एका खाजगी कन्स्ट्रक्शन कंपनीत मॅनेजर म्हणून कामाला आहेत. या कंपनीचे नरिमन पॉईट परिसरात कार्यालय आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मालकांनी त्यांना दोन कोटी रुपये गिरगाव येथील एका व्यापाऱ्याला देण्यासाठी दिली होती. त्यामुळे ते त्यांच्या सहकाऱ्यासोबत गिरगाव येथे दोन कोटीची कॅश घेऊन गेले होते. शुक्रवारी सायंकाळी सहा ते सव्वासहाच्या सुमारास ते दोघेही गिरगाव येथील एसव्हीपी रोड वरुन जात होते. यावेळी बाईकवरुन आलेल्या दोघांनी त्यांना अडवून त्यांची चौकशी सुरु केली होती. आपण क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याची बतावणी करुन या दोघांनी त्यांच्याकडील दोन कोटीची कॅश असलेली बॅग आणि तीन मोबाईल घेऊन पलायन केले होते. हा प्रकार त्यांनी त्यांच्या मालकांना सांगून व्ही. पी रोड पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेऊन स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गौरव मसुरकर याला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील 45 लाखांची कॅश आणि तीन चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.