

मालाड (मुंबई) : भूमिपार्क मालवणी मालाड पश्चिम येथील सामान्य रुग्णालयात गंभीर जखमी असलेल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीवर तेथील आयाने उपचार करून घरी पाठवल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे.
रविवार दि. ५ रोजी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान मालवणी भीमनगर - स्कॉर्टस कॉलनीतील दीक्षा राहुल ठाकूर या मुलीच्या डोक्यावर घराची टाइल्स पडल्याने दुखापत झाली. तिच्या पालकांनी तिला सामान्य रुग्णालयात नेले असता तिथे डॉक्टर उपस्थित नव्हते. त्यानंतर थोड्यावेळाने तेथील परिचारिका अ. प. कदम यांनी मुली सोबतच्या लोकांना बाहेर पाठवून दिले आणि तेथील महिला प्रसूती गृहातील आयाला मुलीवर प्रथमोपचार करण्यास सांगितले. त्यानुसर आयाने मुलीच्या जखमेवर मलमपट्टी केली. मुलीला जास्त लागले नाही. औषध लावल्याने बरे होईल असे सांगितले. त्यानंतर थोड्यावेळाने तेथे डॉक्टर आले. पण त्यांनी मुलीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप मुलीच्या पालकांनी केला. मुलीला घरी आणल्यानंतर तिला चक्कर येऊ लागली. त्यामुळे तिच्या पालकांनी खासगी रुग्णालयात घेऊन जाऊन मुलीवर उपचार करवून घेतले. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलीच्या डोक्याला गंभीर झाली आहे असे सांगून चार टाके घातले आणि घरी सोडले.
आमच्या जखमी मुलीला घेऊन आम्ही भूमिपार्क रुग्णालयात ३ वाजताच्या सुमारास गेलो मात्र डॉक्टर नव्हते. तिथे उपस्थित असलेल्या नर्सने आम्हाला बाहेर काढले. त्यानंत एक आया आली आणि तिने माझ्या मुलीला मलम कापूस लावून पट्टी लावली. त्यानंतर बाहेरून एक डॉक्टर आले. त्यांनी आमच्याकडे लक्षही दिले नाही त्यानंतर नर्स ने आम्हाला घरी पाठवून दिले.
प्रियांका ठाकूर, जखमी मुलीची आई.
मलमपट्टी आम्हीच करावी असे डॉक्टरांनीच आदेश दिले आहेत असे तेथील आयाने सांगितले. त्यानंतर तिने शताब्दी रुग्णालय कांदिवलीत जाण्याचा सल्ला दिला. टीटीचे इंजेक्शनही दिले नाही.
रवींद्र डोंगरे, सामाजिक कार्यकर्ता