मुंबई : गणेश विसर्जनापूर्वी मुंबई शहर व उपनगरातील रस्ते समतोल करण्यासह खड्डे बुजवले जातील, असे आश्वासन देणार्या मुंबई महापालिका प्रशासनाचे खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शनिवारी होणार्या बाप्पाच्या विसर्जनामध्ये खड्ड्यांचे विघ्न येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उंच मूर्त्या खड्ड्यांतून नेणार कशा, असा प्रश्न मंडळांना पडला आहे.
मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. त्यामुळे सेवा सुविधा पुरवण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेकडून उचलण्यात येते. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी विसर्जन मार्गावरील खड्डे प्राधान्याने बुजवण्यात यावे, असे निर्देशही दिले होते. परंतु गिरगाव चौपाटीकडे जाणारे काही रस्ते वगळता अन्य रस्त्यांवर आजही खड्डे दिसून येतात. विशेष म्हणजे खड्ड्यांपेक्षा रस्तेच असमतोल आहेत. त्यामुळे अशा रस्त्यांतून गणेशमूर्तीची ट्रॉली नेताना मंडळांसाठी तारेवरची कसरत आहे. असमतोल रस्त्यांमुळे ट्रॉली हलून मूर्तीला धोका पोहोचण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई शहर व उपनगरात अनंत चतुर्दशीला 7 ते 8 हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन होते. या दहा फुटापेक्षा उंच मुर्त्यांची संख्या साडेचार हजारांपेक्षा जास्त आहे. यातील काही मूर्ती ट्रकमधून नेल्या जात असल्या, तरी अनेक मुर्त्या या ट्रॉलीवर बनवण्यात आल्या आहेत. ट्रॉलीवरील मुर्त्या नेताना विशेष काळजी घ्यावी लागते. ट्रॉलीची चाके लहान असल्यामुळे असमतोल रस्त्यामुळे मूर्तीचे बॅलन्स जाऊ शकते. एवढेच नाही, तर मूर्तीला तडे जाण्याची शक्यताही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे किमान विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्याची महापालिकेला अनेकदा विनंती करण्यात आली होती. परंतु आजही अनेक ठिकाणी रस्ते असमतोल दिसून येत असल्याचे मंडळाचे म्हणणे आहे.
जेव्हीआरची दुरवस्था
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डेच नाही, तर असमतोल रस्त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरील प्रवास नकोसा झाला आहे. त्यामुळे यंदा या रस्त्यावरून बाप्पाची मिरवणूक काढायची कशी असा प्रश्न अनेक मंडळांना पडला आहे. पवई तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन होत असल्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी करण्यात आली होती. पण याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप मंडळाने केला आहे.
पावसामुळे पुन्हा खड्डे पडले!
विसर्जन मार्गावरील खड्डे गणेश उत्सवापूर्वीच बुजवण्यात आले होते. रस्तेही समतोल करण्यात आले. मात्र मुंबई शहर व उपनगरात पडत असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत. पावसामुळे हे खड्डे बुजवताना अडचणी येत असल्या तरी अनेक खड्डे बुजवण्यात आल्याचे पालिकेच्या रस्ते विभागातील एका वरिष्ठ अभियंत्याने सांगितले.
गणेश विसर्जनापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवले जातात असे महापालिकेकडून सांगण्यात येते. महापालिका खड्डे बुजवतेही पण पुन्हा पुन्हा खड्डे पडतात. त्यामुळे दरवर्षी खड्ड्यांचा प्रश्न निर्माण होतो. गेल्या 15 वर्षापासून विसर्जन मार्गावर पडणार्या खड्ड्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करूनही अद्यापपर्यंत यावर मार्ग काढण्यात आलेला नाही.
अॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, समन्वय समिती