

मुंबई: यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई महापालिकेने तब्बल २ हजार ७५४ मेट्रिक टन विसर्जनोत्तर मूर्ती साहित्याचे सकंलन केले आहे.
हे संकलित पीओपी साहित्य मुलुंड येथील केंद्रात एकत्रित करण्यात आले आहे. त्यावर शास्त्रीय व पर्यावरणपूरक पद्धतीने रिसायकलिंग करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. या कामासाठी पालिकेने इच्छुक संस्थांकडून अर्ज मागवले आहेत.
महापालिकेने १६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विसर्जित मूर्ती आणि त्यासोबतचे विसर्जनोत्तर साहित्य गोळा केले आहे. त्यासाठी ७०७ वाहन फेर्यांचा वापर करून २ हजार ७५४.८५ मेट्रिक टन वजनाचे साहित्य तात्पुरत्या साठवणूक केंद्रापर्यंत पोहोचविले आहे.
विसर्जनोत्तर पीओपी साहित्य कृत्रिम तलावांमध्ये राहिल्यास अथवा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये गेल्यास पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. जलस्रोतांमध्ये किंवा समुद्रकिनार्यांवर मूर्तींचे अवशेष पुन्हा दिसून येण्याची शक्यता असते.
त्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आणि केंद्रीय प्रदूषण निंयत्रण मंडळाच्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनंतर पालिकेने ही कार्यवाही केली आहे. त्यासाठी पालिकेने एसओपी जारी केली होती.
या संपूर्ण कार्यवाहीसाठी महापालिकेने मूर्तींचे संकलन, वाहतूक, नोंदी, देखरेख आणि तात्पुरती साठवणूक याबाबत शहरस्तरीय प्रमाणित कार्यपद्धती अर्थात एसओपी जारी केली होती.
विसर्जनानंतर दुसऱ्याच दिवशी संकलन
विसर्जनानंतर दुसर्या दिवशी म्हणजे २६ सप्टेंबर रोजी सर्वाधिक १३१ वाहन फेर्यांद्वारे ५१०.९२ मेट्रिक टन साहित्य वाहून नेण्यात आले.
विभागनिहाय आकडेवारीनुसार, के/पश्चिम विभागातून सर्वाधिक ३१४.८२ मेट्रिक टन, एस विभागातून २५३.५८ मेट्रिक टन आणि डी विभागातून २४९.४३ मेट्रिक टन साहित्य वाहून नेण्यात आले, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली.