

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरित करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम विरोध दर्शविला आहे. दोन्ही विमानतळांनी कोणत्याही स्थलांतराशिवाय स्वतंत्रपणे आणि आपापल्या पूर्ण क्षमतेनुसार कार्यरत राहावे, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांना पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे मुंबईतील उड्डाणे नवी मुंबईत हलविण्याच्या हालचाली थांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुंबई विमानतळावरील टर्मिनल-१ च्या पुनर्विकासासाठी येथील आंतराष्ट्रीय उड्डाणे नवी मुंबईला हलविण्याची योजना होती. मुंबई विमानतळाचे संचालन करणाऱ्या 'एमआयएएल' या कंपनीने त्यानुसार पुढील उन्हाळ्याचे वेळापत्रक आखले होते. टर्मिनल-१चे नूतनीकरण आणि पुनर्विकासच्या निमित्ताने मुंबईतून उड्डाण करणारी तसेच मुंबईत येणारी काही आंतरराष्ट्रीय विमाने नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित करायची. त्यासाठी बहरीन, दोहा, जेद्दा, काठमांडू, कुवेत, मस्कत आणि रियाध यांसह १४ प्रमुख आंतरराष्ट्रीय शहरांसाठीची उड्डाणे नवी मुंबईत हलविण्याचा प्रस्ताव होता. मात्र, अनेक आंतराष्ट्रीय विमान कंपन्यांनी या प्रस्तावाला विरोध केला.
शिवाय, मुंबईतून विमानप्रवासाची सुविधा उपलब्ध असताना प्रवाशांना नवी मुंबईपर्यंत जाण्याची वेळ येणार असल्यानेही नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र, अदानींच्या 'एमआयएएल'कडून मुंबईतील उड्डाणे स्थलांतरीत करण्याबाबत ताठर भूमिका घेतली गेल्याने साशंकता निर्माण झाली होती.
या सर्व वादंगाच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र पाठवून मुंबई विमानतळावरील एकही विमान नवी मुंबईत हलविण्यात येऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. मुंबई विमानतळावरून होणारे एकही आंतरराष्ट्रीय उड्डाण बंद किंवा डायव्हर्ट केले जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी या पत्रात मांडल्याचे समजते. शिवाय, टर्मिनल-१च्या पुनर्विकासासाठी पर्यायी मार्गही फडणवीस यांनी सुचविला आहे.
सध्याचे टर्मिनल-१ए पाडून त्याचा पुनर्विकास करण्यापूर्वी त्याला पर्याय म्हणून नवीन टर्मिनल-१बी उभारण्यात यावे. त्यानंतर टर्मिनल-१ए वरील उड्डाणे नव्या १बी मध्ये स्थलांतरित करावीत. सध्याचे टर्मिनल-१ए रिकामे झाल्यानंतर ते पाडून टप्प्याटप्प्याने त्याचा पुनर्विकास करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी पत्रातून केली आहे. या पर्यायामुळे टर्मिनलच्या पुनर्विकासाचे काम सुरू असतानाही मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबईत हलविण्याची गरज भासणार नाही, अशी राज्य सरकारची भूमिका आहे.