

मुंबई: इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्याची तब्बल १६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी १० जणांना अटक केली असून, आरोपींकडून सुमारे १.३५ कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्यात २२ मोबाईल फोनसह अन्य साहित्याचा समावेश आहे. या कारवाईची माहिती मुंबईचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सोमवारी दिली. एका विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली १६ लाख रुपये घेतल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती.
त्यानंतर तपास सुरू करण्यात आला. सोशल मीडियावरून विद्यार्थ्यांना हेरायचे तपासात ही टोळी नियोजनबद्ध पद्धतीने प्रवेश फसवणूक करत असल्याचे समोर आले. आरोपी सोशल मीडियावर पेड जाहिराती देत.
इंजिनिअरिंगसह विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी जाहिरातींना प्रतिसाद दिल्यानंतर आरोपी त्यांच्याशी संपर्क साधत असत. विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना विविध खासगी विद्यापीठांच्या कॅम्पसमध्येही नेले जात होते.
त्यानंतर एनआरआय कोटा किंवा मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले जात होते. प्रवेश निश्चित असल्याचे सांगून विद्यार्थ्यांकडून मोठ्या रकमा उकळल्या जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
२२ मोबाईलसह १.३५ कोटींचा मुद्देमाल
तक्रारीनंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि अन्य माध्यमांतून आरोपींचा माग काढला. त्यानंतर कारवाई करत १० जणांना अटक केली. आरोपींकडून सुमारे २२ मोबाईल फोन आणि अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ कोटी ३५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आणखी किती विद्यार्थ्यांची फसवणूक ?
या टोळीने आतापर्यंत आणखी किती विद्यार्थ्यांना अशा प्रकारे गंडा घातला, त्यांच्याकडून किती रक्कम उकळली, तसेच आरोपींच्या बँक खात्यांमधून किती व्यवहार झाले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात आणखी आरोपी किंवा पीडित समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.