

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली मात्र सर्वच पक्षांनी आपले उमेदवार गुलदस्त्यात ठेवले होते. मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार कोण हे कोडं उलगडले असून यात मुंबई महापालिकेवर सर्वच पक्षांनी आजी-माजी महापौर, उपमहापौरांसह स्थायी समिती अध्यक्षही निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वच पक्षाने ज्येष्ठ माजी नगरसेवकांना पुन्हा संधी दिली आहे. यात १९९२ पासून सलग निवडून येणाऱ्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह माजी महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, सुहास वाडकर, माजी विरोधी पक्षनेता रवी राजा, देवेंद्र (बाळा) आंबेरकर, सभागृह नेते प्रभाकर शिंदे, विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे, सुधार समिती अध्यक्ष उज्वला मोडक, विविध पक्षांचे गटनेते व अन्य प्रभाग समिती अध्यक्षांचा समावेश आहे. यातील अनेकजण हे मागील तीन ते चार महापालिका निवडणुकीमध्ये निवडून आले असून काहीजण पाच ते सहा वेळा निवडून आले आहेत. तर काहींनी विधानसभेमध्येही आपापल्या भागाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे या ज्येष्ठ माजी नगरसेवकांना मुंबईकर पुन्हा शहराचे नेतृत्व करण्याची संधी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचा अनुभव असणे, सभागृहातील कामकाज कसे असावे, कोणत्या अधिनियमांतर्गत नगरसेवक मुद्दा उपस्थित करू शकतात. महापौर व समिती अध्यक्षांना कोणकोणते अधिकार आहेत. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प, शहरातील विविध कामांसाठी अर्थसंकल्पात करण्यात येणाऱ्या आर्थिक तरतुदी, नगरसेवकांना मिळणारा निधी, व अन्य माहिती नव्या नगरसेवकांना होणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्येष्ठ माजी नगर-सेवकांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याचे सर्वच राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. आपल्या विभागांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून लोकसेवा करणाऱ्या या नगरसेवकांना निवडून द्यायचे की नाही हे सर्वस्वी मुंबईकरांवर अवलंबून आहे.
शिवसेना (उबाठा)
श्रद्धा जाधव
किशोरी पेडणेकर
हेमांगी वरळीकर
सुहास वाडकर
देवेंद्र आंबेरकर
विशाखा राऊत
शैलेश फणसे
भाजपा
उज्वला मोडक
राखी जाधव
रवी राजा
प्रभाकर शिंदे