

मुंबई: मुंबईतील मतदार यादीमध्ये आढळलेली दुबार नावे वगळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला मोठी अडचणी येत आहे. त्यामुळे प्रभागनिहाय मतदार यादी तयार झाल्यानंतर मतदार यादीतील फोटोच्या आधारावर नावे वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्याची घरोघरी जाऊन सुरू असलेली शोध मोहीम थांबवण्यात आली असून १० डिसेंबरनंतर पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी १ जुलैपर्यंतची मतदार यादी निश्चित करण्यात आली आहे. या मतदार यादीमध्ये सुमारे ४ लाख ३३ हजार मतदारांची दुबार व त्यापेक्षा जास्त ठिकाणी नावे आढळून आली आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने दुबार नावे असलेल्या मतदारांची शोध मोहीम हाती घेतली होती. यासाठी प्रत्येक प्रभागांमध्ये घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत होती. परंतु या तपासणीमध्ये एकच नाव असलेले अनेक जण मतदार आढळून आले. उदाहरणार्थ, दक्षिण मुंबईतील फोर्ट ए विभाग कार्यालयाचे हद्दीत केलेल्या सर्वेक्षणामध्ये ४०० दुबार नाव असलेल्या मतदारांपैकी ३८८ वेगवेगळे व्यक्ती असल्याचे आढळून आले. ज्यांचे नाव एकसारखे होते.
अशाच प्रकारे काही प्रभागांमध्ये एकाच नावाचे अनेक व्यक्ती असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने मतदारांची दुबार नावे शोधण्यासाठी प्रक्रिया अजून सोपी केली आहे. यापुढे मतदारांची दुबार नावे शोधताना मतदार यादीतील त्यांच्या फोटोचा आधार घेण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. मतदारांचे दुबार नाव शोधताना नाव एकसारखी असली, परंतु फोटो वेगवेगळा असेल तर, अशी नावे वगळण्यात येणार नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. प्रभागणीय मतदार यादी निश्चित झाल्यानंतर मतदारांची दुबार नावे व गळणे अजून सोपे जाईल, त्यामुळे १० डिसेंबरनंतर मतदारांची दुबार नावे वगळण्यासंदर्भात पुन्हा मोहीम राबवण्यात येईल, असे पालिकेच्या निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
मतदारांची दुबार नावे
निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील नोंदणीनुसार २८,६४८ नावे एकदा आणि ३ लाखांहून अधिक नावे दोनदा आली आहेत. ६०,०१२ नावे तीन वेळा, २२,५०५ नावे चार वेळा, १०,७१३ नावे पाच वेळा, ५,९६२ नावे सहा वेळा, ३,४२८ नावे सात वेळा, २,०६१ नावे आठ वेळा, १,४८४ नावे नऊ वेळा आणि १,०१७ नावे दहा वेळा आली आहेत.
मृतांची नावेही वगळणार
मतदार यादीमध्ये काही मृतांची नावेही असल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून केला जात आहे. याची दखल घेत ही नावेही वगळण्यात येणार आहेत. ही नावे वगळण्यासाठी मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याने त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. असे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर ती नावे वगळण्यात येतील, असेही निवडणूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
२२ डिसेंबरपर्यंत अंतिम मतदार यादी जाहीर होणार
मतदार यादीतील मतदारांच्या दुबार नावाचा घोळ तसेच मृत व्यक्तीचे नाव वगळण्याचे काम करण्यासाठी प्रत्येक बूथ अधिकाऱ्यावर जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. त्यामुळे ही कामे तातडीने पूर्ण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी २२ डिसेंबरपर्यंत जाहीर करण्यात येईल, असे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.