

मुंबई :बँक खात्यातील पैसे चोरण्याचे प्रकार वाढत असतानाच आता सायबर गुन्हेगारांनी थेट शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबईतील एका ७६ वर्षीय व्यावसायिकाच्या डिमॅट खात्यातील तब्बल ४ कोटी ५८ लाख रुपयांचे शेअर्स परस्पर विकून त्यातून मिळालेल्या पैशांतून केवळ १ कोटी ७१ लाख रुपयांचे पेनी स्टॉक खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
गुंतवणूकदाराच्या परवानगीशिवाय हा व्यवहार करण्यासाठी आरोपींनी सिम स्वॅप पद्धतीचा वापर केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या माध्यमातून व्यावसायिकाच्या मोबाइल क्रमांकासह ई-मेलचा ताबा मिळवून डिमॅट खात्यात प्रवेश करण्यात आला. या प्रकरणात एका महिलेसह शेअर ब्रोकिंग कंपनीच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.
दक्षिण विभाग सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सिम स्वॅप म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकाचे दुसरे सिमकार्ड मिळवून त्याचा ताबा घेणे. यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाने नवीन सिमकार्ड मिळविले जाते. नवीन सिम सुरू झाल्यानंतर मूळ सिमकार्ड बंद पडते. त्यामुळे संबंधित व्यक्तीला मोबाइलवर कॉल किंवा संदेश येणे बंद होते.
मात्र, नवीन सिमकार्डवर येणारे कॉल आणि संदेश सायबर गुन्हेगारांना मिळू लागतात. बँकिंग आणि शेअर व्यवहारांसाठी पाठविले जाणारे ओटीपीही त्यांच्या हाती लागतात. या फसवणुकीतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे शेअर्स विकून मिळालेली रक्कम आरोपींनी थेट स्वतःच्या खात्यात वळविली नाही. त्याऐवजी त्याच डिमॅट खात्यातून अत्यल्प किमतीचे पेनी स्टॉक खरेदी केले. त्यामुळे ४ कोटी ५८ लाख रुपयांच्या मौल्यवान शेअर्सची जागा केवळ १ कोटी ७१ लाख रुपयांच्या शेअर्सनी घेतली.
पेनी स्टॉक म्हणजे बाजारात अत्यल्प किमतीला उपलब्ध असलेले शेअर्स. अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये अनेकदा खरेदी-विक्रीचे व्यवहार कमी प्रमाणात होतात. त्यामुळे हे शेअर्स विकायचे ठरविल्यास योग्य खरेदीदार मिळणे कठीण होऊ शकते. परिणामी, खात्यात शेअर्स दिसत असले तरी त्यांचे प्रत्यक्ष बाजारमूल्य खूपच कमी असू शकते. या व्यवहारातून गुंतवणूकदाराला मोठा आर्थिक फटका बसल्याचे समोर आले आहे.
ब्रोकिंग कंपनीतील व्यवस्थापकाच्या भूमिकेची चौकशी
या प्रकरणात ब्रोकिंग कंपनीच्या व्यवस्थापकाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. पेनी स्टॉक खरेदीच्या व्यवहारात त्याने मदत केल्याचा आरोप आहे. आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारे अन्य गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती का, या व्यवहारातून कोणाला आर्थिक फायदा झाला आणि यामागे आणखी कोणाचे जाळे आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत. फसवणुकीची माहिती मिळाल्यानंतर दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून २ कोटी ८६ लाख रुपयांहून अधिक मूल्याचे शेअर्स गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित रकमेबाबत आणि आरोपींच्या आर्थिक व्यवहारांबाबत तपास सुरू आहे.
गुंतवणूकदारांनी सतर्क राहणे गरजेचे!
डिमॅट खात्यातील शेअर्स सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतवणूकदारांनी केवळ बाजारातील चढ-उतारांवर लक्ष ठेवून चालणार नाही, तर खात्याच्या सुरक्षेकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. मोबाइल नेटवर्क अचानक बंद पडल्यास त्यामागे सिम स्वॅपचा प्रकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी तातडीने मोबाइल कंपनीशी संपर्क साधावा. डिमॅट खात्यातील प्रत्येक व्यवहाराची माहिती नियमित तपासावी. अनोळखी व्यवहार दिसल्यास त्वरित ब्रोकिंग कंपनीला कळवून शेअर्सची खरेदी-विक्री थांबविण्याची विनंती करावी. मोबाइल आणि ई-मेलचे पासवर्ड सुरक्षित ठेवावेत. विशेष म्हणजे, सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वेळ न घालवता १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार करावी. वेळीच सावधगिरी बाळगल्यास आयुष्यभराची गुंतवणूक एका क्षणात गमावण्याचा धोका टाळता येऊ शकतो.
आरोपी महिलेने डिमॅट खात्याचे पासवर्ड बदलून ओटीपी मिळविले आणि परस्पर शेअर्स विकले. राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजाराशी संपर्क साधून संशयास्पद व्यवहार रोखले. त्यामुळे २ कोटी ८६ लाख रुपयांचे शेअर्स वाचविण्यात यश आले."
नंदकुमार गोपाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर