

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी (Saif Ali Khan attack) मोठी अपडेट समोर आली आहे. चोरीच्या उद्देशाने हल्लेखोर सैफ अली खानच्या घरी घुसल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीची ओळख निष्पन्न झाल्याचा दावा मुंबईतील झोन ९ चे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी आज (दि.१६) पत्रकारांशी बोलताना केला.
दीक्षित गेडाम म्हणाले की, काल रात्री, आरोपींनी सैफ अली खानच्या घरात प्रवेश करण्यासाठी फायर एस्केप जिना वापरला. हा दरोड्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. हल्लेखोराला अटक करण्यासाठी १० तपास पथके काम करत आहेत. वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Saif Ali Khan attack)
ते पुढे म्हणाले की, हल्लेखोर शिड्याचा वापर करून घरी घुसला. हल्लेखोर सतत ठिकाण बदलत असल्याचे समोर आले आहे. हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांची दहा पथके तयार करण्यात आली आहेत. हल्लेखोर चोरीचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने घरात घुसल्याचे निष्पन्न झाले आहे. हल्लेखोराला अटक केल्यानंतर पुढची माहिती मिळेल. हल्लेखोर सीसीटीव्हीत आढळून आला आहे, असे त्यांनी सांगितले.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरी मध्यरात्री चाकू हल्ला झाला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, काल रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसला आणि त्याच्या घरातील मोलकरणीशी वाद घालू लागला. यादरम्यान सैफने मध्यस्थी करून त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला करत त्याला जखमी केले. ही घटना पहाटे २ ते २.३० च्या दरम्यान घडली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी सैफच्या घरी त्याचे कुटुंबीय होते.