

मुंबई : चार वेगवेगळ्या कारवाईत 1 कोटी 34 लाखांच्या एमडी ड्रग्जसह सहाजणांच्या एका टोळीला मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी 557 ग्रॅमचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. एनसीपीएस कलमांतर्गत कारवाई केल्यानंतर या सहाजणांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांनी एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरू असताना वांद्रे, धारावी, गोरेगाव परिसरात काहीजण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वांद्रे, वरळी, कांदिवली आणि आझाद मैदान युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानंतर कांदिवली युनिटने गोरेगाव येथील दिडोंशी परिसरातून एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 230 ग्रॅम एमडी जप्त केले असून त्याची किंमत 57 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. दुसऱ्या कारवाईत वांद्रे युनिटच्या अधिकाऱ्यांनी दोघांना वांद्रे येथून अटक करून त्यांच्याकडून 105 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. त्याची किंमत पावणेसोळा लाख रुपये आहे. तिसऱ्या घटनेत गोरेगाव येथून आझाद मैदान युनिटने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 36 लाख 60 हजारांचे 122 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. चौथ्या कारवाईत वरळी युनिटने धारावी परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून एकास अटक केली.त्याच्याकडून पोलिसांनी शंभर ग्रॅम एमडी जप्त केले असून त्याची किंमत 25 लाख रुपये इतकी आहे. अशा प्रकारे चार वेगवेगळ्या ठिकाणी कांदिवली, वांद्रे, वरळी व आझाद मैदान पोलिसांनी एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या 6 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 1 कोटी 34,85,557 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला.