

Mumbai Crime News : टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एका मुलाने ५७ व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना मुंबईतील कांदिवली परिसरात घडली. एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एका मुलाने ५७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. २ जुलै) सायंकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
रिपोटनुसार, गुजराती दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री कांदिवलीतील 'सी-ब्रूक' इमारतीत आपल्या कुटुंबासोबत राहतात. बुधवारी त्यांनी आपल्या मुलाला ट्युशन क्लासला जाण्यास सांगितले होते, परंतु मुलाची क्लासला जाण्याची इच्छा नव्हती. याच कारणावरून आई आणि मुलामध्ये वाद झाला. अल्पवयीन मुलगा रागाच्या भरात इमारतीच्या ५७ व्या मजल्यावर गेला आणि त्याने खाली उडी मारली. त्याचा जागीच मृत्यू झाला. एकुलता एक मुलाने टोकाचे पाऊल उचल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. त्या अल्पवयीन मुलाला इमारतीवरुन उडी मारताना कोणी पाहिले होते का किंवा त्यावेळी तिथे आणखी कोणी उपस्थित होते का, याचाही पोलीस तपास करत आहेत. इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. या सर्व पैलूंचा पोलीस तपास सुरु आहे.