

मुंबई : गोरेगाव परिसरात मानवी संवेदनांना काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. चोर असल्याच्या संशयावरून परिसरातील काही लोकांनी 26 वर्षीय हर्षल परमा या तरुणाला पकडून हातपाय बांधले आणि त्याला निर्दयीपणे मारहाण केली. या मारहाणीमध्ये हर्षलचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत सलमान मोहम्मद खान, इसामुल्ला खान, गौतम आणि राजीव गुप्ता या चौघांना अटक केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हर्षल परमा हा निरपराध होता आणि त्याच्यावर लावलेला चोरीचा संशय चुकीचा होता.
स्थानिकांच्या मते, घटनेच्या वेळी परिसरात अनेक लोक उपस्थित होते, मात्र कोणीही पीडिताला वाचवण्यासाठी पुढे आले नाही. या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे “कायद्याचा न्याय आपल्या हातात घेणाऱ्या प्रवृत्ती”वर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.