

मुंबई : आर्थिक संकटात सापडल्यामुळे बेस्ट प्रशासनाने बसचे भाडे दुप्पटीने वाढवले खरे पण मुंबईकर बेस्टवर रुसले आहेत. भाडेवाढीनंतर आठवडाभरात बेस्टचे सुमारे नऊ लाखांहून अधिक प्रवासी घटले आहेत. असे असले तरी बेस्टचे उत्पन्न मात्र एक कोटींनी वाढले आहे.
बेस्ट प्रशासनाने प्रवासी तिकीट दरात 9 मेपासून दुप्पट वाढ केली आहे. पहिल्याच दिवसापासून प्रवासी संख्येत घट झालेली पाहायला मिळाली. आठ दिवसात हा आकडा नऊ लाखांपर्यंत गेला आहे. मे महिन्यात चाकरमानी गावी जातात. त्यामुळे आधीच प्रवासी कमी असतात. त्यामुळे बेस्टचे नक्की किती प्रवासी घटले याबाबत निष्कर्ष काढण्यास वेळ लागेल, असे बेस्ट प्रशासनाचे म्हणणे आहे.
बेस्ट बसची सुविधा चांगली द्यायची सोडून तिकिट दरात वाढ करणे कितपत योग्य आहे. तासनतास रांगेत उभे राहायचे त्यानंतरही उभे राहून प्रवास करायला मिळतो. इतके पैसे द्यायला परवडत नसून जनतेला लुटायचे काम बेस्ट प्रशासनाने सुरू केले आहे असा संताप प्रवासी सुदाम काटकर यांनी व्यक्त केला आहे.