मुंबई : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवेसाठी भरघोस तरतूद करून प्रचंड खर्च झाल्यानंतरही मुंबईकरांचे आरोग्य मात्र भयंकर बिघडले आहे. प्रजा फाऊंडेशनने गुरुवारी जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार, मुंबईत मधुमेह, अतिसार आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढले आहेत.
२०१४ ते २०२३ या १० वर्षांच्या कालावधीत मुंबईमध्ये अतिसाराचे सर्वाधिक ९ लाख ३६ हजार ६१ रुग्ण आढळले. त्याखालोखाल क्षयरोगाचे रुग्ण ३ लाख ८९ हजार ८०३, उच्च रक्तदाबाचे रुग्ण ३ लाख ७० हजार ७९५ रुग्ण, तर मधुमेहाचे रुग्ण ३ लाख ७० हजार ८१ आढळले. डेंग्यूचेही १ लाख ३९ हजार ८९२ इतके रुग्ण सापडले आहेत. या दशकात अतिसार आणि क्षयरोग रुग्णांची संख्या अधिक असली तरी २०१४ च्या तुलनेत २०२३ मध्ये या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र उच्च रक्तदाब, मधुमेह व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. मुंबईतील प्राथमिक आरोग्य सेवा, मुख्य आजारांचा प्रादुर्भाव, श्वसनाचे आजार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या यावर प्रकाश टाकणारा 'मुंबईतील आरोग्य समस्यांची स्थिती २०२४' हा अहवाल आहे. मुंबई महानगरपालिकेने मागील काही वर्षामध्ये अर्थसंकल्पामध्ये आरोग्यावरील खर्चात ९८ टक्क्यांनी वाढ केली आणि तरीही मुंबईला पडलेला आजारांचा विळखा कायम आहे. मुंबईमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, डेंग्यू आणि टायफॉईड या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असली तरी त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण पाच टक्क्यांनी घटल्याचे प्रजा फाऊंडेशनचे सीईओ मिलिंद म्हस्के यांनी सांगितले.

