

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलिसांना लष्कर-ए-जिहादी या दहशतवादी संघटनेने शहरात भीषण बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी व्हॉटस्अॅपवरून दिली आहे. यानंतर पोलिसांनी शहरात तत्काळ हाय अलर्ट जारी केला आहे. मुंबईत 400 किलो आरडीएक्स आणण्यात आले असून, एक कोटी लोकांना ठार मारण्याची क्षमता त्यात असल्याचे धमकीच्या संदेशात म्हटले आहे. तसेच, 34 वाहनांत मानवी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेला शुक्रवारी व्हॉटस्अॅपवरून हा धमकीचा संदेश पाठविण्यात आला आहे. 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचेही या संदेशात म्हटले आहे. यासंदर्भात पोलिस सूत्रांनी सांगितले की, ज्या व्हॉटस्अॅप क्रमांकावरून हा संदेश पाठवण्यात आला, तो शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबई पोलिस नेहमीच सतर्क आहेत. आम्ही सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत. जनतेने घाबरू नये. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. मुख्य म्हणजे, अशी धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही.
या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. शहरात सर्वत्र नाकेबंदी, संशयित वाहनांची तपासणी आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरक्षा कडेकोट करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर भाविक मुंबईत दाखल होत असल्याने, पोलिसांनी मंडप परिसर, रेल्वेस्थानके, विमानतळ, बाजारपेठा आणि गर्दीच्या भागांमध्ये गस्त वाढवली आहे.
सायबर सेल आणि दहशतवादविरोधी पथकाने मिळालेल्या संदेशाचा सखोल तपास सुरू केला आहे. हा संदेश खरा आहे की खोटा, याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक उपकरणांचा वापर केला जात आहे. अशाप्रकारे मिळणार्या धमक्या अनेकदा खोट्या ठरल्या असल्या, तरी पोलिसांनी कोणताही धोका न पत्करण्याचे ठरवले आहे. नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळल्यास लगेच पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.