

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने आपल्या शाळांतील विद्यार्थ्यांना हिंदी भाषेतून पर्यावरणाचे धडे देण्याचे ठरवले असून यासाठी लेखक अनिता वर्मा यांच्या ‘दिल्ली की बुलबुल’ या हिंदी पुस्तकाची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याला शिवसेना ठाकरे गट, मनसेच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवला असून मराठीत पर्यावरणावर अधारित पुस्तके नाहीत का असा सवाल केला आहे.
हिंदी सक्तीचा वाद अजून संपलेला नाही. आता महापालिका प्रशासनाने या वादत भर टाकण्याचा नवीन प्रयत्न केल्याचे दिसत आहे. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना पर्यावरण व नैतिकतेबाबत जागृत करण्यासाठी कार्यानुभवाचा एक भाग म्हणून हिंदी भाषेत असलेले ‘दिल्ली की बुलबुल’ हा कथासंग्रह विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे ठरवले आहे. यासाठी निविदा प्रक्रिये राबवण्यात आली आहे.
हे पुस्तक सरसकट मराठी माध्यमांसह अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये वाटण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी सुमारे एक लाखापेक्षा जास्त पुस्तके खरेदी करण्यात येणार आहेत. मात्र यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
शासन स्तरावरून शैक्षणिक धोरण व शालेय अभ्यासक्रम ठरविला जातो. त्याअनुषंगाने अध्ययन, अध्यापन साहित्य उपलब्धही करुन देण्यात येते. विषयनिहाय अभ्यासक्रम व त्यानुसार पाठ्यपुस्तिका उपलब्ध करून दिली जातात. विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयक ज्ञान मिळावे यासाठी ‘दिल्ली की बुलबुल’ हे पर्यावरण आधारित गोष्टीचे पुस्तक महापालिकेने खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
महानगरपालिका मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, तामिळ, तेलुगू आणि कन्नड अशा 8 विविध माध्यमाच्या 1048 प्राथमिक तसेच 147 माध्यमिक शाळा अशा 1195 शाळा चालवित आहे. या शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांना मराठी विषय हा बंधनकारक आहे. त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेमध्ये असलेल्या पर्यावरण विषयक पुस्तकाचे वाटप होणे आवश्यक आहे.
मराठी भाषेतून विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढवा
पर्यावरणाची र्हास रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे दिलेच पाहिजे. यासाठी मराठी भाषेत अनेक पुस्तके आहेत. विद्यार्थ्यांना हिंदी भाषिक पुस्तकातून पर्यावरणाचे धडे देण्याचा हट्टास कशाला, असा सवाल शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवेंद्र आंबेरकर, व मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केला आहे.