

मुंबई: अडीच लाख रुपयांची लाच घेताना महानगरपालिकेच्या एका दुय्यम अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. विशाल भालचंद्र वाणी असे या अभियंत्याचे नाव असून तो मुंबई महानगरपालिकेच्या एफ/नॉर्थ, पर्जन्य जलवाहिनी विभागात दुय्यम अभियंता म्हणून कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तक्रारदार एका बांधकाम कंपनीशी संबंधित असून त्यांच्या कंपनीकडून एका बांधकाम साईटचे काम सुरु आहे. या बांधकाम साईटवरील जलनिष्कासन परवानगीबाबत त्यांनी एफ/नॉर्थ विभागात अर्ज केला होता.
या अर्जावर काहीच कारवाई होत नव्हती. त्यामुळे त्यांनी दुय्यम अभियंता विशाल वाणी यांची भेट घेतली होती. यावेळी विशालने त्यांच्या अर्जावर कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडे दहा लाखांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी त्यांच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीची 22 एप्रिलला शहानिशा करण्यात आल होती. यावेळी विशाल वाणी यांनी तक्रारदाराकडे जलनिष्कासन परवानगीच्या अनुषंगाने दहा लाखांची मागणी करुन अडीच लाख रुपये घेण्याचे मान्य केले होते. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी संबंधित कार्यालयात सापळा लावून विशाल वाणी यांना अडीच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईने उपस्थित मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.