

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिका कर्मचाऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार रुपये बोनस (सानुग्रह अनुदान) जाहीर केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये यंदा वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम दोन हजार रुपयांनी (2000 रु.) वाढली आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांसोबतच खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी देखील ३१ हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. या घोषणेनुसार, महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक यांना ३१ हजार रुपये, अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते, शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित व विनाअनुदानित) यांना ३१ हजार रुपये आणि अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित व विनाअनुदानित) यांनाही ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे.
या व्यतिरिक्त, आरोग्य स्वयंसेविकांना १४ हजार रुपये भाऊबीज भेट आणि बालवाडी शिक्षिका व मदतनीस यांना ५ हजार रुपये भाऊबीज भेट जाहीर करण्यात आली आहे. ज्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक उत्साहात साजरी होणार आहे.