

प्रकाश साबळे
मुंबई :
मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासह सर्व विभाग कार्यालय आणि रूग्णालयातील उपहारगृहात सुरक्षित आणि स्वच्छ अन्नपदार्थ मिळण्यासाठी महानगरपालिका प्रशासन आता सरसावले आहेत. यासाठी पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयातील चार खात्यांमधील अधिकारी यांना एफडीएकडून प्रशिक्षण देवून उपहारगृहावर वाॅच ठेवण्यासाठी समिती नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी एकूण १०० अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने तयार केला असून, तो महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
महानगरपालिका मुख्यालयातील उपहारगृहात अस्वच्छता आणि ताकात माशी आढळल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने सदर उपहारगृहाचा परवाना निलंबित केला होता. परिणामी महिनाभर उपहारगृह बंद होते. यामुळे पालिका कर्मचारी, बंदोबस्तांमधील पोलीस आणि अभ्यागंताचे खाण्या- पिण्या अभावी हाल झाले होते. मात्र आता पुन्हा अशी वेळ येवू नये, म्हणून खबरदारी घेतली जात आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाचे पालन करण्यासाठी पालिकेने प्रत्येक विभाग कार्यालयातील चार वरिष्ठ अधिकारी यांची समिती नियुक्त करून उपहारगृहातील स्वच्छता, सुरक्षा, किंचन, कामगार आणि खाद्य पदार्थाचे दर निश्चितीसह इतर कामांवर देखरेख ठेवणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता चांगले अन्नपदार्थ खाण्यास मिळतील असे सांगितले जात आहे.
या बाबीवर 'वाॅच'
१) आस्थापना, परिसर व सुविधा
२) उपकरणे व भांडी
३) कच्चा माल व पुरवठा नियंत्रण
४) साठवण व तापमान नियंत्रण
५) पाणी, बर्फ व वाफ
६) वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य व प्रशिक्षण
७) कीटक नियंत्रण
८) स्वच्छता व निर्जंतुकीकरण
९) कचरा व्यवस्थापन
१०) उत्पादन माहिती व ग्राहक जागरूकता
११) अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली व नोंद
कमिटीमध्ये यांचा समावेश
n परिरक्षण खात्यातील प्रतिनिधी
n प्रशासकीय अधिकारी
n वैद्यकीय अधिकारी
n आणि इतर विभागातील प्रतिनिधी