BMC budget 2026 discussion : महापालिकेच्या सभेचा विक्रम; 188 नगरसेवक 94 तास बोलले!

मुंबईच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; ठाकरे सेना,काँग्रेस, एमआयएमसह विरोधकांचा सभात्याग
BMC budget 2026 discussion
BMC Pudhari Photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 2026-27 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रावर गेल्या 15 दिवसात 188 नगरसेवक तब्बल 94 तास बोलले. एवढ्या मोठ्या संख्येने नगरसेवक बोलण्याची वेळ पहिलीच आहे. त्यामुळे हा मुंबई महानगरपालिकेच्या शिरपेचात एक नवा विक्रमच नोंदवला गेला आहे.

मुंबई महानगरपालिका तब्बल चार वर्षानंतर अस्तित्वात आली. यात अनेक जण पहिल्यांदाच नगरसेवक बनले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पाबद्दल प्रत्येकाला उत्सुकता होती. या अर्थसंकल्पावर आपणही बोलावे यासाठी 188 नगरसेवकांनी आपली नावे महापौर रितू तावडे यांच्याकडे दिली.

BMC budget 2026 discussion
Pimpri Chinchwad News: घोषणांचा पाऊस, पण विकास कुठे? पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; घोटाळ्यांची मालिका सुरुच

महापौरांनीही वेळेचे फारसे बंधन घातले नाही. त्यामुळे तब्बल 94 तास चर्चा चालली. मुंबई महानगरपालिकेमध्ये पूर्वी 8 ते 10 तास बोलणारे नगरसेवक होते. पण ही संख्या जेमतेम 30 ते 35 पर्यंत होती. मात्र यावेळी अनेक नगरसेवक अभ्यासू असल्यामुळे अर्थसंकल्पावरील चर्चा रंगली व नवा विक्रम नोंदवला गेला.

अर्थसंकल्पाला मंजुरी

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 31 मार्चपूर्वी मंजूर केला जातो. मात्र यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीमुळे अर्थसंकल्प मंजूर करण्यास यावेळी विलंब झाला. नवनियुक्त नगरसेवकांना अर्थसंकल्पावर आपले विचार मांडण्यात यावे, अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळेचे बंधन ठेवण्यात आले नाही. मध्यरात्री साडेबारा वाजता पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नगरसेवकांनी चर्चेच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण मुंबई शहराला खड्डेमुक्त रस्ते मिळतील अशी ग्वाही दिली.

कोळीवाड्यांच्या विकासासंदर्भात महापालिका सकारात्मक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबईत रखडलेल्या उड्डाणपुलांची कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मुंबई शहराला 4600 दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज असून सध्या 4,100 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे गारगाई व समुद्राचे खाारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्याशिवाय सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणीही उपलब्ध केले जाणार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. त्याशिवाय नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या आरोग्य विषयासह अन्य प्रश्नांना उत्तरे दिली.

BMC budget 2026 discussion
Kolhapur Municipal Corporation | शंभर कोटींच्या जागेवर घाव, आरक्षण उठविण्याचा डाव

अर्धा तासापेक्षा जास्त वेळ अर्थसंकल्पावर आयुक्तांनी प्रशासनाचे नियोजन सभागृहात कथन केले. अखेर गुरुवारी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास पालिकेच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. महापौरानी अर्थसंकल्प मंजूर होण्याची घोषणा करताच सत्ताधारी भाजपा शिवसेनेच्या नगरसेवकांनी बाके वाजून दाद दिली. यावेळी महापौर रितू तावडे यांनी नगरसेवकांनी अभ्यासपूर्ण केलेल्या भाषणाचे कौतुक केले.

विरोधकांचा सभात्याग

अर्थसंकल्पावर आयुक्तांचे भाषण संपल्यानंतर महापौरांनी अर्थसंकल्प मंजुरीसाठी टाकला असता, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुंबई शहराच्या विकासाला दिशा न देणारा अर्थसंकल्प असल्याचे सांगत, सभात्याग करण्याची घोषणा केली. यावेळी ठाकरे गटासह काँग्रेस, एमआयएम नगरसेवकांनी सभात्याग केला. यावेळी सभागृहात सत्ताधारी व विरोधकांमध्ये घोषणाबाजी रंगली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news