

मुंबई : महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बुधवारी सकाळी मुंबईतील मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटीवर स्वत: फेरफटका मारीत पाहणी केली. येथील रंगरंगोटीसह सौंदर्यीकरणात येणार अडथळेे तत्काळ हटवा असे आदेश त्यांनी पालिका अधिकार्यांना दिले आहेत.
यावेळी त्याच्यासमवेत यावेळी महानगरपालिकेच्या उप आयुक्त (परिमंडळ 1) चंदा जाधव, पोलीस उप आयुक्त प्रशांत परदेशी, विशेष कार्य अधिकारी (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, सहायक आयुक्त, अधिकारी उपस्थित होते. त्यांना आयुक्तांनी विविध सूचना करीत तत्काळ अमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.
या परिसराला मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटक भेटी देत असतात. त्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसर सुटसुटीत आणि स्वच्छ ठेवण्यावर भर द्यावा, अनावश्यक सूचनाफलक काढून टाकावेत, पादचारी मार्ग, आसन व्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासह परिसरातील विजेच्या खांबांवर लोंबकळणार्या वाहिन्या तत्काळ हटविण्याचे निर्देश त्यांनी दिले. येथील दुभाजक सतत स्वच्छ ठेवण्यावर भर देणे, ‘आरे’चे स्टॉल आणि त्यांची रंगरंगोटीत साम्य ठेवण, पालिकेच्या परवानगीशिवाय कोणीही कोणतेही फलक, पोस्टर्स लावणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) परिसरातील छोटी चौपाटी येथील बांधकाम साहित्य काढून तेथे स्वच्छता राखावी. या ठिकाणी रस्त्यालगत असलेली पोलिसांची चौकी तेथून हटवून मागील छोटी चौपाटी येथील बांधकामात स्थलांतरीत करावी, बांधकामात प्रसाधनगृहाची व्यवस्था करावी, तसेच गिरगांव चौपाटीकडून येणार्या नागरिकांसाठी येथे येण्यासाठी छान पायवाट साकारावी अशा विविध सूचना त्यांनी केल्या.