
मुंबई : मुंबई थंडीची चाहूल लागली असून महापालिकेने वायू प्रदूषण नियंत्रणासाठी थंडीमध्ये जागोजागी शेकोटी पेटवण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी शेकोटी पेटवणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांना उघड्यावर शेकोटी पेटवता येणार नाही.
वातावरणातील बदलांमुळे मुंबई शहर आणि उपनगरात हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होऊन वायू प्रक्षणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेच्या वतीने मार्गदर्शक तत्वे यापू र्वीच लागू केली आहेत. मुंबईत थंडीच्या दिवसात सार्वजनिक ठिकाणासह इमारतीच्या बाहेर व चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात शेकोटी पेटवण्यात येतात. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे प्रदूषणांमध्ये मोठी वाढ होते. यावर उपाय म्हणून पालिकेने शेकोटी पेटवू नये, असे आवाहन मुंबईकरांना केले आहे. तरीही नागरिक शेकोटी पेटवणार असतील तर, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
थंडीच्या दिवसांत शहरात पेटणाऱ्या शेकोट्यांना आळा घालण्यासाठी मुंबई पालिकेच्या २५ विभाग कार्यालयाच्या हद्दीत पथक तयार करण्यात येणार असून या टीम रात्रीच्या वेळी शहरात ग्रस्त घालणार आहेत. पहिल्यांदा पकडल्यानंतर समज देऊन सोडण्यात येईल, मात्र त्यानंतर तेथे पुन्हा शेकोटी आढळून आली तर, दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना आता शेकोटी पेटवणे चांगलेच महागात पडणार आहे. शहरात मोठ्या प्रमाणात इमारत बांधकामाची कामे सुरू आहेत. त्याशिवाय मेट्रो प्रकल्प व अन्य रस्त्याची कामेही सुरू आहेत. त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी कामगारांकडून स्वयंपाक बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर होतो. त्यामुळे धूर निर्माण होऊन प्रदूषण होते. हा वापरही थांबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.