

मुंबई : मुंबई विमानतळ परिसरात पक्ष्यांच्या धडकेमुळे हवाई वाहतुकीला निर्माण होणारा धोका दूर व्हावा म्हणून फनेल झोनमधील पक्ष्यांचा वावर कमी करण्यासाठी शास्त्रज्ञ, पर्यावरणविषयक तज्ज्ञ तसेच तरुण अभ्यासकांकडून नवकल्पना मागविण्याची सूचना मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली.
मुंबई महापालिकेने 15 दिवसात वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्राचे आधुनिकीकरण करुन त्याला छप्पर टाकण्याचे काम सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मुंबई विमानतळ परिसरात पक्ष्यांच्या धडकेमुळे विमानांना होणारा धोका कमी करण्यासंदर्भात गुरुवारी शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक झाली. अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली.
शेलार म्हणाले, मुंबई विमानतळाच्या 10 किलोमीटर परिसरात कचरा क्षेपणभूमी, कांदळवन अथवा वनक्षेत्र यामुळे पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विमान वाहतुकीला धोका निर्माण होत असतो. ठाणे खाडी परिसरात येणार्या परदेशी पक्ष्यांमध्ये ही वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पालिका अधिकार्यांनी सांगितले की, पक्ष्यांना रोखण्यासाठीचे कोणतेही तंत्रज्ञान सध्या पालिककडे उपलब्ध नाही. एका नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन कचर्याची विल्हेवाट लवकर लावण्याबाबत महापालिका विचार करीत असून याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यावर, फनेल क्षेत्रात उडणार्या पक्ष्यांची समस्या सोडवण्यासाठी संशोधक, उद्योजक, अभ्यासक, स्टार्टअप यांना आवाहन करा, त्यांच्याकडून नवकल्पना मागवा, तसेच त्यावर, पर्यावरण विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची मदत घेऊन अहवाल तयार करा, असे शेलार यांनी सांगितले.