Mumbai Active COVID Cases
मुंबई : कोरोनाच्या अडीच ते तीन वर्षाच्या काळात राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाने केलेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित भ्रष्टाचाराचे आराडे केले जात असतानाच कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळून आल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. मुंबईत तर कोरोनाचे सध्या ५३ सक्रिय रुग्ण असून ते गृहविलगीकरणात आहेत. सुदैवाने सोमवारी संपूर्ण राज्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.
गेल्या काही दिवसांपासून सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि इतर देशांमध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभुमिवर मुंबईत खबरदारी म्हणून १०० हून अधिक बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.
आजाराचा विषाणू सामान्य पातळीवर स्थिरावला असल्याने, कोविडचे रुग्ण अत्यंत कमी प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोविड-१९ चा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. जानेवारी ते एप्रिलपर्यंत कोविड रुग्णांची संख्या खूपच कमी होती. परंतु मे महिन्यापासून काही प्रमाणात रुग्ण दिसून येत आहेत. खबरदारी म्हणून पालिकेने सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात २० बेड, गरोदर स्त्रिया आणि मुलांसाठी २० आणि ६० सामान्य बेड तयार ठेवले आहेत.
कस्तुरबा रुग्णालयात २ अतिदक्षता व १० बेडचा स्वतंत्र वॉर्ड उपलब्ध आहे. कोविड संबंधित लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित महानगरपालिकेच्या दवाखाना, रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा. स्वतःहून औषधे घेऊ नयेत, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
सोमवारी राज्यात एकूण ४६ चाचण्या झाल्या त्यापैकी १५ आरटीपीसीआर चाचणी तर ३१ पिट टेस्ट करण्यात आल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
सध्याचा जो कोरोना विषाणू आहे, तो बाहेरील देशात जास्त आहे. सध्यातरी आपल्या देशात आणि महाराष्ट्रात त्याचा धोका नाही. काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही मास्क नाही लावला तरी स्वच्छ रुमालाने गर्दीच्या ठिकाणी तोंड, नाक झाकू शकता. कोरोनाचा प्रभाव अद्याप तरी आपल्याकडे दिसत नसला तरी, खबरदारी घ्यायलाच हवी, असे नायर रुग्णालयातील न्याय वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश डेरे यांनी सांगितले.