पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील घाटकोपर परिसरात अनेक ठिकाणी ४० फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळून आले आहेत. विमानाने धडक दिल्याने फ्लेमिंगोचा मृत्यू झाल्याचे सांगिण्यात येत आहे. मृत पक्षी पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आली आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. तर या घटनेत विमानाचेही नुकसान झाल्याचे वन्यजीव कल्याण गटाच्या सदस्याने आज (दि.२१) सांगितले.
'रेझिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' (RAWW) चे संस्थापक आणि वन विभागातील मानद वन्यजीव वॉर्डन पवन शर्मा यांनी सांगितले की, घाटकोपरमध्ये काही ठिकाणी मृत पक्षी दिसल्याबद्दल अनेकांचे फोन येत होते. मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी मृत पक्षी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
मुंबईला येणाऱ्या एमिरेट्सच्या विमानाच्या धडकेत ४० फ्लेमिंगोचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्रीची असल्याची माहिती आहे. या धडकेनंतर घाटकोपर परिसरात अनेक मृत फ्लेमिंगो आढळून आले. या धडकेमुळे विमानाचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र, विमान विमानतळावर सुखरूप उतरले. सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. वन अधिकारी आणि प्राणीमित्र कार्यकर्त्यांनी मृत फ्लेमिंगो पक्ष्यांना बाहेर काढले आहे.
मुंबईच्या खाडीवर येणारे गुलाबी रंगांचे फ्लेमिंगो पक्षी हे पक्षीप्रेमींच्या आकर्षणाचे स्थान आहेत. घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर घाटकोपरमधील लक्ष्मीनगर परिसरात सोमवारी (दि.२०) वीस ते तीस फ्लेमिंगो पक्षी छिन्न विच्छिन अवस्थेत आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच पक्षीमित्र सुनील कदम त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिस, पक्षी मित्र या फ्लेमिंगोच्या मृत्यूचा शोध घेत आहेत. मात्र स्थानिक नागरिक आणि पक्षी मित्रांच्या मते हा फ्लेमिंगोचा थवा विमानाच्या मार्गात आला असावा आणि त्याची धडक बसून संपूर्ण थव्यातल्या पक्षांचा धडकेने मृत्यू होऊन ते खाली कोसळले. या घटनेमुळे घाटकोपरमध्ये भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे. रात्री उशिरा या मृत फ्लेमिंगोंची शोध घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरु होते.
हेही वाचा