

मुंबई : मुंबईतील नागपाडा येथील परिसरात पाण्याची टाकी साफ करत असतांना ४ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. श्वास गुदमरून कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत हसीपाल शेख (वय १९), राजा शेख (वय २०), जिउल्ला शेख (वय ३६), इमांडू शेख (वय ३८) यांचा मृत्यु झाला आहे. तर पुरशन शेख (३१) यांच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डाॅक्टराकडून सांगण्यात आले.
नागपाडा परिसरात मिंट रोडवर रविवारी ९ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या परिसरात गुड लक मोटर ट्रेनिंग स्कूलजवळील बिस्मिल्ला स्पेस बिल्डिंग या निर्माणधीन इमारतीची पाण्याची टाकी स्वच्छ करत असताना ही दुर्घटना घडली. पाच कर्मचारी ही पाण्याची टाकी साफ करत होते. त्यावेळी श्वास गुदमरून ४ जण बेशुद्ध पडले. त्यानंतर आणखी एक कामगार बेशुद्ध पडला. अशाप्रकारे एकापाठोपाठ ४ कामगार टाकीत गुदमरल्याने मृत्यु पावल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामन दलाने व्यक्त केला. तर एक जण वाचला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
या दुर्घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर पोलीस पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलातील जवानाने तात्काळ कामगारांना टाकीतून बाहेर काढून जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासून ४ कामगारांना मृत घोषित केले. या प्रकरण मुंबई पालिकेकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून सदर काम हे एका खाजगी कंत्राटदाराकडून सुरू होते. सदर दुर्घटनेप्रकरणी जे.जे. पोलीस अधिक तपास करत असून अद्यापही कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले.