

मुंबई : दहा कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी एका बांधकाम कंपनीच्या संचालिका हर्षा रविंद्र जडाव आणि मॅनेजर जयेश वालजी बागडा या दोघांविरुद्ध अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फ्लॅट बुकींगच्या पैशांचा अपहार करून या दोघांनी एका बँकेच्या निवृत्त मॅनेजरसह 90 जणांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे अस्तित्वात नसलेल्या जागेवर इमारत बांधकामाचे प्रपोजल ठेवून ही फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे.
यातील वयोवृद्ध तक्रारदार अंधेरी येथे राहत असून एका नामांकित बँकेतून मॅनेजर म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांना त्यांच्या विवाहीत मुलीसाठी एक फ्लॅट बुक करायचा होता. यावेळी त्यांना त्यांच्या मित्रांकडून जडाव यांच्या कंपनीकडून अंधेरी परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम इमारतीची माहिती समजली. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन फ्लॅटविषयी चौकशी केली. यावेळी कंपनीचे संचालक व मालक रविंद्र जडाव, त्यांची पत्नी हर्षा जडाव आणि मॅनेजर जयेश बागडा यांनी त्यांना त्यांचे विविध गृहप्रकल्प असल्याचे सांगून त्यापैकी एक प्रोजेक्ट अंधेरी येथे सुरू असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवले होते. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या आठ ते दहा मित्रांनी तिथे प्रत्येकी एक फ्लॅट बुक केला होता. त्यासाठी त्यांना काही रक्कम टोकन म्हणून देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यासोबत कंपनीने एक करार केला. या करारात त्यांना अठरा महिन्यांत फ्लॅटचा ताबा देण्याचे मान्य करण्यात आले होते.
काही महिन्यानंतर त्यांनी फ्लॅटच्या किंमतीत वाढ केली. त्यामुळे त्यांना फ्लॅटसाठी अतिरिक्त रक्कम भरावी लागणार होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांचा करार रद्द करुन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र त्यांनी कोणालाही पैसे परत केले नाही. चौकशीदरम्यान तक्रारदारांना त्यांच्यासह 89 जणांनी त्यांच्या कंपनीत फ्लॅटसाठी 10 कोटी 17 लाख 50 हजारांची गुंतवणूक केली होती. विशेष म्हणजे अंधेरी येथे अस्तित्वात नसलेली मालमत्ता त्यांच्या मालकीची असल्याची सांगून सर्वांना या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केल्यास स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते.